चंद्रपूर : फुले, शाहू, आंबेडकरांनी चालवलेल्या चळवळीमुळे लोकांना व्यक्त होण्याचा अधिकार मिळाला आहे. एकीकडे निवडणूक प्रचारात फुले, शाहू, आंबेडकर यांचे गुणगान करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांवर प्रश्न विचारणाऱ्यांवर कारवाई करायची, हे संयुक्तिक नाही. हिंमत असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्त्यावर यावे आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे साहित्य जाळून दाखवावे, असे थेट आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या बहुजन समता पर्व कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या चर्चेत अंधारे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. अंधारे पुढे म्हणाल्या, सध्या देश ज्या परिस्थितीतून जात आहे, ते पाहता २०२४ ची निवडणूक ही देशातील लोकशाही व्यवस्थेची शेवटची निवडणूक असेल, असे वाटते. त्यानंतर देशात हुकूमशाही राजवट येण्याचीच शक्यता आहे. घटनेने प्रत्येकाला बोलण्याचा, व्यक्त होण्याचा कायदेशीर अधिकार दिला आहे, मात्र या अभिव्यक्तीवर दिवसेंदिवस हल्ले होत आहेत. लोकांचा आवाज दाबला जात आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना त्यांच्या घटनात्मक अधिकारांतर्गत सरकार मिळाले आहे. मात्र सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे

हेही वाचा >>>सावधान..! सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल

ब्राह्मणमुक्तीची हाळी देणारे लोक ‘सिलेक्टिव्ह राजकारण’ करतात

नाशिकच्या काळाराम मंदिरातील वेदोक्त मंत्र प्रकरणावरूनही अंधारे यांनी खडेबोल सुनावले. ही घटना संयोगीताराजे अर्थात राजघराण्यातील व्यक्तीसंदर्भात घडल्याने लगेच ब्राम्हणमुक्त मंदिराची हाक महाराष्ट्रभर देण्यात आली. मात्र एखाद्या दलिताच्या मंदिर प्रवेश मुद्यावर सोयीने मौन बाळगले जाते. ब्राह्मणमुक्तीची हाळी देणारे लोक ‘सिलेक्टिव्ह राजकारण’ करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

हेही वाचा >>>अकोला: ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण…

शब्द फिरवायला मी चंद्रकांत पाटील नाही : अंधारे

अंधारे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी राज्याचे मंत्री, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबाबतही मिष्किल टिप्पणी केली. माझ्या बोलण्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी अजिबात माफी मागणार नाही. माझा प्रत्येक शब्द तोलून-मोजून बोललेला आहे. शब्द बदलायला मी चंद्रकांत पाटील नाही, असा टोला त्यांनी हाणला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare appeal to devendra fadnavis regarding phule ambedkar literature rsj 74 amy
First published on: 13-04-2023 at 17:30 IST