बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ सांगतात, पण ‘जन की बात’ समजून घेत नाही, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. मराठा आरक्षणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सुरू असलेली स्टंटबाजी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी असल्याचे त्या म्हणाल्या.

शिवसेना ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला आज, मंगळवारी दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून प्रारंभ झाला. जिजाऊंच्या जन्मस्थानी नतमस्तक झाल्यावर अंधारे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी संवाद यात्रेची माहिती देतानाच विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मातृतीर्थ यात्रा सिंदखेडराजा ते शिवतीर्थ दादर अशी मुक्त संवाद पदयात्रा ११ लोकसभा, ३१ विधानसभा मतदारसंघ तर १८ जिल्ह्यांतून जाणार आहे. ३५ दिवसांच्या या पदयात्रेत ७० लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत, शेतकरी, मजूर, कामगार, महिला, विद्यार्थी ते बुद्धिजीवी अशा सर्व समाजघटकांसोबत आम्ही संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी, प्रश्न समजून घेतल्या जातील, तसेच राज्यकर्त्यांची मनमानी, ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर, घातक निर्णय यांची माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे. यात्रेद्वारे ‘जन की बात’ समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

हेही वाचा – बुलढाणा : संदीप शेळकेंच्या विरोधात गुन्हा दाखल, कारण काय? वाचा…

हेही वाचा – नागपूरकर विंग कमांडर विनित विजय मारवाडकर यांना युद्ध सेवा पदक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, पंतप्रधान केवळ ‘मन की बात’ सांगतात. ते ‘ जन की बात’ ऐकून वा समजून घेत नाही. जनतेच्या मनात काय आहे, हे समजून घेण्यात त्यांना स्वारस्यच नसल्याची मार्मिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. मराठा आरक्षण, राज्य सरकारने जारी केलेली अधिसूचना यावर मंत्री नारायण राणे यांनी केलेली वक्तव्ये निरर्थक आहे. मुळात ही राज्यसभेच्या उमेदवारीसाठीची ‘स्टंटबाजी’ आहे. त्यांची राज्यसभेची मुदत संपत आल्याने, भाजपवर राजकीय दबाव आणण्याचे त्यांचे डावपेच असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, छगन मेहेत्रे, लखन गाडेकर आदी हजर होते.