नागपूर : शहर पोलीस दलातील तीन कर्मचारी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या कार्यालयात बिनधास्त पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. युनिटच्या पदाधिकाऱ्यांना मात्र सूट देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गुन्हे शाखेच्या लकडापूल येथील युनिट तीनमधील पोलीस हवालदार आनंद काळे, फिरोज शेख आणि रवी कारदाते हे जुगार खेळत होते. गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हे शाखेच्या युनिट कार्यालयात हा प्रकार सुरू होता. याच युनिटमध्ये सुपारी, तंबाखू आणि धान्य व्यापाऱ्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंधावरून कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू होता. त्यातून आपल्याच सहकाऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. श्याम नावाच्या युवकाने भ्रमणध्वनीने पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या आनंद काळे, फिरोज आणि रवी यांची चित्रफीत तयार केली. ती चित्रफीत पत्रकारांना दिली तसेच समाजमाध्यमांवर प्रसारित केली. ती चित्रफीत पोलीस आयुक्तांकडे गेली. त्यानंतर तडकाफडकी तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, त्या युनिटचे प्रभारी असलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांची साधी चौकशीसुद्धा करण्यात आली नसल्याने चर्चेला ऊत आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा – गडचिरोलीमध्ये आदिवासी युवकांच्या आंदोलनाने भाजप नेते अस्वस्थ!
तीनही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. युनिटचे अधिकारी मुकुंद ठाकरे यांच्याबाबत सध्यातरी काहीही आदेश नसल्याची प्रतिक्रिया गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे.