गडचिरोली वन विभागात धुमाकूळ घालत ८ जणांचा बळी घेणाऱ्या टी ६ वाघिणीने ४ पिलांना जन्म दिला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही वाघीण आपल्या चार पिलांसह वन विभागाच्या कॅमेऱ्यात टिपल्या गेली. त्यामुळे तिला जेरबंद करण्याची मोहीम काही काळ रोखण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. मात्र, त्यापाठोपाठ टी ६ वाघिणीला जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकल्याने अमरावती, ताडोबा येथील पथक गडचिरोली वनविभागातील चातगाव वन परिक्षेत्रात तैनात करण्यात आले. महिनाभरापासून हे पथक या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी जंग जंग पछाडत आहे. अनेकदा पथकाला तिने हुलकावणीदेखील दिली. दरम्यान, शुक्रवारी वन विभागाने राजागाटा चेक परिसरातील जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये ही वाघीण आपल्या चार पिलांसह टिपल्या गेली. त्यामुळे वनविभागाने तिला जेरबंद करण्याची मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे. चारही पिल्लं स्वस्थ असून ते पूर्णपणे आईवर अवलंबून असल्याने तूर्त तरी तिला जेरबंद करता येणार नाही, असे वन विभागाचे म्हणणे आहे.

गावकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिलांसह फिरणारी वाघीण खूप आक्रमक असते. तिच्या आसपास कुणीही आला तर ती तत्काळ हल्ला करू शकते. यामुळे चातगाव परिसतील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा वन विभागाने दिला आहे. सध्या या वाघिणीचा वावर राजगाटा चेक परिसरात आहे. चार दिवसांपूर्वीच एक महिलेवर तिने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. शुक्रवारी उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत या वाघिणीने ८ जणांचा बळी घेतला आहे.