नागपूर : हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्थलांतरित पक्षी हिवाळय़ात भारतात येतात. मुंबईच्या ठाणे खाडी किनारपट्टीला भेट देणाऱ्या ‘हुमायू’ नावाच्या फ्लेमिंगोने अवघ्या ३१ तास ५४ मिनिटांत महाराष्ट्र ते गुजरात असा प्रवास केला आहे.

उपग्रह ‘टॅगिंग’ केलेला ‘हुमायू’ने वसईत आठ तास तर गुजरातमधील केनक्रेजमध्ये तासाभराची विश्रांती घेत भावनगर गाठले. त्यामुळे त्याचा पुढचा प्रवास आणि विश्रांतीचा कालावधी याचा अभ्यास बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) साठी महत्त्वाचा ठरणार आहे.

भारतीय उपखंडातील फ्लेमिंगोचे प्रजनन आणि प्रजनन नसलेल्या ठिकाणी त्याचे स्थलांतरणाचे रहस्य उलगडण्यासाठी बीएनएचएसने राज्यात पहिल्यांदा मुंबई येथे रिंगिंग आणि उपग्रह टेलिमेट्री’ अभ्यासाचा प्रकल्प हाती घेतला. त्याअंतर्गत सहा फ्लेमिंगोंना जानेवारी ते एप्रिल या कालावधीत सौर ऊर्जेवर चालणारे ‘जीपीएस-जीएसएम रेडिओ टॅग’ लावण्यात आले. या सहाही फ्लेमिंगोंना पक्ष्यांवर काम करणाऱ्या अभ्यासकांची नावे देण्यात आली. त्यातील ‘हुमायू’ या फ्लेमिंगोने जून महिन्यात ३१ तास ५४ मिनिटांचा प्रवास करत थेट गुजरात गाठले. २८ जूनला रात्री १० वाजून २८ मिनिटांनी त्याने ठाणे खाडी सोडली. तासाभरात तो वसईला पोहोचला. तब्बल आठ तास त्याठिकाणी मुक्काम केल्यानंतर ७ वाजून २८ मिनिटांनी तो निघाला व रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी गुजरातमधील केनक्रेजमध्ये पोहोचला. त्याठिकाणी तासभर मुक्काम करून तो ३० जूनला सायंकाळी सहा वाजून १३ मिनिटांनी भावनगरला पोहोचला.

फ्लेमिंगोच्या प्रवासादरम्यानच्या घडामोडी आता अधिक स्पष्ट होणार आहेत. ‘हुमायू’ने उत्तरेकडे जाताना किनाऱ्यावरून जाणे पसंत गेले. वापी ते सुरत तो समुद्रमार्गे गेला. सुरत ते भावनगर हा प्रवास त्याने सरळ मार्गाने केला. सध्या तो भावनगरच्या पाणथळ परिसरातच फिरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. राहुल खोत, उपसंचालक, ‘बीएनएचएस