यवतमाळ : शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष २३ जूनपासून सुरू झाले असले, तरी तालुक्यातील बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेत अद्याप शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत संतप्त पालकांनी आज बुधवारी यवतमाळ जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांसह धडक देत, शिक्षण विभागात शाळा भरवली. या प्रकाराने जिल्हा परिषद शिक्षण विभागात खळबळ उडाली.

जिल्हा परिषद हायस्कूल, बेलोरा येथील शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यवतमाळ यांना निवेदन देऊन तातडीने शिक्षक भरती करण्याची मागणी केली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने यापूर्वीही ७ जुलै रोजी पत्राद्वारे शाळेत रिक्त शिक्षकांची पदे भरण्याची मागणी केली होती. मात्र, शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी, शाळेतील वर्ग चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे.

शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असून, पालकांत नाराजीचे वातावरण आहे. शाळा शाळा व्यवस्थापन समितीच्या मते, प्रशासनाने तातडीने शिक्षक नियुक्त न केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. आमच्या शाळेत शिक्षक नसल्यामुळे वर्ग बंद आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती थांबली आहे. प्रशासनाने तातडीने शिक्षक नियुक्त करावे, अन्यथा शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती करण्यास आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.

संतप्त पालक विद्यार्थ्यांना घेऊन सकाळीच जिल्हा परिषदेत पोहोचले. प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नंतर शिक्षण विभाग गाठून गाऱ्हाणे मांडले. तालुक्यातील सर्वात मोठी शाळा असूनही बेलोरा येथे शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थी शाळा सोडून इतरत्र जाण्याची भीती आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांना निवेदन दिले आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे, अन्यथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून न निघणारे ठरेल, अशी भीती पालकांनी व्यक्त केली. दोन दिवसात शाळेत शिक्षकांची नियुक्ती न केल्यास विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेलोरा जिल्हा परिषद शाळेत यापूर्वी शिक्षकांच्या बेशिस्त वर्तणुकीचा दोन घटना घडल्याने शाळेत चांगले शिक्षक मिळावे, असा आग्रह गावकऱ्यांनी केला आहे. यावेळी बेलोरा येथील सरपंच जयवंत गुघाने, विनोद आडे, गणेश नेवारे, उमेश महल्ले, गजानन गिरी, गौतम मुन, निलेश पखाले, महेश गोफणे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.