चंद्रपूर: महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात चंद्रपूर जिल्ह्यातील अमृतगुडा या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर तेलंगणातील इटिकलपाडू या गावात जंगलात चार महिला व सहा पुरूष अशा दहा बड्या नक्षल नेत्यांनी मुक्काम केला होता, अशी माहिती समोर आली आहे. या भागातील जंगलात पाण्याची कमतरता असल्याने कालांतराने नक्षलवादी तिथून निघून इतरत्र मुक्काम हलवल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या छत्तीसगड व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाने नक्षलवाद्यांविरूध्द उघड मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी रेस्ट झाेनमध्ये मुक्काम हलवल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल महिन्याचे शेवटच्या आठवड्यात अशाच प्रकारे नक्षलवादी चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात दाखल झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरातील जंगलात सहा पुरूष व चार महिला अशा नक्षल दलम मधील मोठ्या कॅडरने मुक्काम केला होता. दोन तीन दिवस त्यांचा मुक्काम होता. विशेष म्हणजे दहा नक्षलवाद्यांच्या मुक्कामाची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा नक्षल सेल पथका तथा तेलंगणा नक्षल सेलचे अधिकाऱ्यांनी या भागात गस्त केली होती. मात्र पोलीस खबऱ्यांनी नक्षलवाद्यांनी या भागातून इतरत्र मुक्काम हलविल्याचे सांगितल्यानंतर पोलीस पथक परत आले. या १९९० च्या दशकात या जिल्ह्यात नक्षलवादी सक्रीय होते. या जिल्ह्यात चकमक देखील झाली होती. माकोडी रेल्वे स्थानक नक्षलवाद्यांनी जाळले होते. तसेच या जिल्ह्यात नक्षल चकमकीत पोलीस व सामान्य असे मिळून आठ जण शहीद झाल्याचीही माहिती आहे. नक्षलवादी चंद्रपूर जिल्ह्याचा रेस्ट झोन म्हणून उपयोग करतात. आता पून्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर या जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात नक्षलींनी मुक्काम केल्याने खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना विचारले असता, दहा नक्षलवाद्यांनी या भागात मुक्काम केल्याची माहिती मिळाली होती. तिथे नक्षल पथक जावून देखील आले असे सांगितले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात नक्षलवादी आले नव्हते, आम्ही सीमावर्ती भागातील सर्व गावातील खबऱ्यांच्या संपर्कात आहे असेही ते म्हणाले.