अकोला : गोमांस विक्रीच्या संशयावरून एका दुकानात टाकलेल्या छाप्यानंतर अकोला शहरातील बैदपुरा भागात दोन गट समोरा-समोर आले. या गटामध्ये मारहाण व तुरळक दगडफेक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. दोन्ही गटातील जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरात मोठा वाद झाल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यात अकोला जिल्ह्याची ओळख ही अत्यंत संवेदनशील. गृहविभागाच्या दप्तरीही तशी नोंदच आहे. क्षुल्लक कारणावरून हिंसाचाराची ठिणगी पाडत जातीय तेढ आणि तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेकदा झाला. जातीय तणावावरून वादाची परिस्थिती निर्माण होते. दरम्यान, दिवाळीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असतांना दोन गटातील वादातून तणाव निर्माण झाला. शहरातील बैदपुरा भागात एका दुकानातून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर पोलीस व बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी त्या दुकानावर कारवाई करण्यासाठी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान दोन संतप्त गट समोरा-समोर आले. त्यांचात मोठा वाद झाला. यावेळी मारहाण झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संतप्त जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळावर रवाना करण्यात आला. या घटनेनंतर शहर कोतवाली पोलीस ठाण्यासमाेर दोन्ही गट पुन्हा एकदा समोरा-समोर आले. दोन्ही गटांनी परस्परांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर शहर कोतवाली पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दोन्ही गटातील या वादातून दगडफेक आणि मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव
गोमांस विक्री प्रकरणावरून छापा टाकण्यात आला. त्यानंतर दोन गटात वाद होऊन तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. शहर कोतवाली पोलीस ठाण्यासमोर भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. पोलीस ठाण्यात भाजप, काँग्रेसचे लोकप्रतिनिधी देखील दाखल झाले आहेत. या प्रकरणात पोलीस चौकशी करीत असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ऐन सणासुदीत शहरातील वातावरण बिघडवणारी घटना घडल्याने अकोला हादरले आहे.