चंद्रपूर : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. घुग्घुस शहराध्यक्ष राजू रेड्डी आणि तालुकाध्यक्ष अनिल नरूले यांच्यातील मतभेदांमुळे कार्यकर्त्यांची अडचण होत आहे. तालुकाध्यक्ष नरूले यांनी घुग्घुस नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घुग्घुस शहरात न ठेवता २५ किलोमीटर दूर दाताळा येथील साईराम सभागृहात ठेवल्या आहेत. यात शहराध्यक्ष रेड्डी यांना डावलल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
घुग्घुस नगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. विधानसभा निवडणुकीत चांगली आघाडी घेणाऱ्या काँग्रेसला येथे पराभवाची श्रृंखला खंडित करण्याची संधी आहे. मात्र, गटबाजीमुळे या संधीचे सोन्यात रूपांतर होणे शक्य नसल्याचे दिसते आहे. चंद्रपूर तालुकाध्यक्ष नरूले यांनी घुग्घुस नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती शहरात न ठेवता दाताळामध्ये घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, जिल्हा प्रभारी अभिजित वंजारी, जिल्हा निरीक्षक मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, चंद्रपूर शहराध्यक्ष रितेश तिवारी, प्रवीण पडवेकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदा जेनेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
घुग्घुस नगरपालिकेची निवडणूक असतानाही शहराध्यक्ष रेड्डी यांनाच या कार्यक्रमातून डावलण्यात आले. रेड्डी मागील दहा वर्षांपासून सक्रिय असून घुग्घुस येथे त्यांनीच काँग्रेस पक्ष जिवंत ठेवल्याचे बोलले जाते. त्यांनाच डावलण्यात आल्याने काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धोटे यांची या संपूर्ण प्रकाराला मूकसंमती असल्याची चर्चा आहे.पालिका निवडणूक घुग्घुसची आणि मुलाखतींचा कार्यक्रम दाताळ्यात, यामुळे काँग्रेस कार्यकर्ते पेचात पडले आहेत.
मुनगंटीवार, वडेट्टीवार, धानोरकर, भांगडिया,जोरगेवार, भोंगळे, देवतळे यांची प्रतिष्ठा पणाला
जिल्ह्यातील १० नगरपालिका व १ नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार कीर्तीकुमार भांगडिय, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, करण देवतळे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर, मूल, राजुरा, गडचांदुर, ब्रम्हपुरी, चिमूर, नागभीड, वरोरा, भद्रावती, घुघूस या दहा नगर पालिका तथा भिसी या एका नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे.
