दरोडाच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना गुंगारा देत न्यायालयातून पळ काढला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, चार तासांच्या शोधमोहिमेनंतर आरोपीला पुन्हा बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. शेख जाफर पठाण मुजफ्फर (३७, रा. रमानगर, कामठी) असे या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी २०२१ रोजी शेख जाफर कामठी परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असताना नवीन कामठी पोलिसांनी त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली होती. दुसर्‍या दिवशी सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून जाफर हा कारागृहात होता. दरम्यान, न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील हवालदार अनिल, सुरेश आणि दोन महिला शिपायांनी शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास जाफर, शेख समीर रहीम आणि अतिक अहमद फय्याज या तीन आरोपींना कामठी येथील न्यायालयात आणले होते. तिघांच्याही हाताला दोरखंड बांधला होता. पोलीस न्यायालयात कागदपत्रे सादर करीत असताना तीनही आरोपी तेथील बाकावर बसले होते तर दोन शिपाई आरोपींजवळ होते. दरम्यान, जाफरने पोलीस शिपायाला धक्का मारून हातातील दोरखंडासह पळ काढला.

न्यायालयाची भिंत ओलांडून तो कामठी-कन्हान रेल्वे मार्गाने पळत सुटला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र जाफरने झाडीझुडुपातून पळ काढला.
नवीन कामठी पोलिसांना ही माहिती समजताच कमलाकर गड्डीमे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण कामठी शहरात जाफरचा शोध घेतला परंतु, तो गवसला नाही. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांनादेखील सतर्क केले. दरम्यान, दोन तीन ठिकाणी तो अनेकांना दिसल्याचे समजताच पोलीस त्याठिकाणी पोहचले. मात्र, पोलीस पोहचण्यापूर्वीच तो तेथून पळून गेला होता. अखेर साडेचार वाजताच्या सुमारास जाफर हा पारखीपुऱ्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच पारखीपुरा गाठले आणि जाफरला ताब्यात घेतले. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.