नागपूर : महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून बांधल्या जात असलेल्या डिप्टी सिग्नल पुला खाली अर्धवट बांधकामामुळे तयार झालेल्या खड्यात पावसाचे साचलेले पाणी न दिल्याने रस्त्यावरून दुचाकीने निघालेला तरुण महेंद्र फटिंग याचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी जमावाने घटनास्थळी आंदोलन करत कायदा व सुव्यवस्थेला वेठीस धरले. मात्र अपघातात दगावलेला तरुण डिप्टी सिग्नल जवळ नव्हे तर पारडी उड्डाणपुलावर दगावल्याचा धक्कादायक प्रकार पोलीसांनी केलेल्या तपासातून समोर आला आहे.

त्यामुळे खोटी तक्रार देत दिशाभूल करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर मार्गाने जमाव एकत्र करत दबाव टाकून कायदा व सुव्यवस्थेला वेठीस धरल्या प्रकरणात पोलिसांनी खोटी तक्रार देणाऱ्या संतकुमार फटिंग आणि त्याच्या नातेवाईकांनी गुन्हे दाखल केले आहेत. फसवणूक करीत नुकसान भरपाईसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचेही पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

स्मॉल फॅक्टरी परिसरातील बी.डी.आयर्न स्टील कंपनीत काम करणारा आपला मुलगा महेंद्र हा मंगळवारी काम आटोपून दुचाकीने घरी येत होता. त्याचा डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंगच्या पुलाजवळ पोल क्रमांक ४ जवळून जाताना खड्डयातल्या पाण्यात पडून डोके, पोटाला मार लागल्याने तो दगावला. पुलाच्या कामाचे साहित्य रस्त्यावरच इतरत्र विखुरले होते. यामुळे अपघात होऊ शकतो याची कल्पना असूनदेखील कंत्राटदार व सुपरवायझरने खड्डे न बुजवता साहित्य रस्त्यावरच ठेवले. लोकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्सदेखील लावले नव्हते. हे कारण देत नागरिक संतप्त झाले व घटनास्थळी तणाव निर्माण केला. संतकुमार फटिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महापालिका कंत्राटदारासोबतच रेल्वे कंत्राटदार आणि सूपरवायझर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.

अखेर पितळ पडले उघडे

जमावाचा आक्रोश पाहता पोलिसांनी दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात डिप्टी सिग्नल जवळचेही सीसीटीव्ही तपासले गेले. मात्र अशा स्वरुपाचा कोणताच अपघात तिथे झाला नसल्याचे पोलिसांना आढळले. दरम्यान पारडी उड्डाणपुलावर एका दुचाकीने समोरून वाहनाला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांना आढळले. त्याची सखोल तपासणी केली असता वास्तव पोलिसांच्या समोर आले. त्यामुळे फटींग यांनी तक्रारीत दिलेले घटनास्थळ आणि वेळही खोटी असल्याचे आढळल्याने पोलिसांनी सरकारची दिशाभूल, दंगल घटवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे सारख्या कलमांखाली गुन्हे दाखल केले.