वाशिम: घातक शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या १० दरोडेखोरांना दरोड्याच्या साहित्यानिशी सिनेस्टाईल जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून १३ लाख ६ हजार रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, वाशिम तालुक्यातील पांगरी धनकुटे ते काटा रोड वरील रेल्वे पुलाच्या समोर काही इसम संशयितरीत्या एक बोलेरो चारचाकी वाहन व इतर काही दुचाकी घेऊन घातक शस्त्रांसह कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसले आहेत. प्राप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. त्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या पडीक जागेमध्ये शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या उद्देश्याने दबा धरून दरोडेखोर असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी त्यांना घेराव घालून १० दरोडेखोरांना जागीच ताब्यात घेतले परंतु अंधाराचा फायदा घेऊन काही जण पळून गेले. हेही वाचा. यवतमाळ जिल्ह्यात पावसाने चिंता वाढवली; शेतशिवारात पाणी जेरबंद केलेल्यांमध्ये विनोद मच्छिंद्र चव्हाण ३० वर्षे, शुभम अनंता चव्हाण २० वर्षे, आकाश नामदेव काकडे २४ वर्षे, गौतम भगवान गायकवाड ३८ वर्षे, संदीप मच्छिंद्र चव्हाण ४० वर्षे, राहुल विश्वास पवार २२ वर्षे, रवी डीगांबर पवार २८ वर्षे, लक्ष्मण भागवत चव्हाण ४९ वर्षे, विशाल जगदीश पवार २१ वर्षे, व राधेश्याम चुनिलाल पवार २९ वर्षे, सर्व संशयीत आरोपी वाशिम जिल्ह्यातील वेग वेगळ्या गावातील आहेत. यावेळी त्यांच्या ताब्यातून दरोडा टाकण्याकरिता लागणारे साहित्य लोखंडी कत्ता, धारदार चाकू, लोखंडी रॉड, लोखंडी कोयता, वेळूच्या काठ्या, मिर्ची पावडर मिळून आले तसेच चारचाकी गाडी बोलेरोची तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाची दोरी, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर मिळून आले. सदर दरोडेखोरांच्या ताब्यातून १ बोलेरो चारचाकी, १३ मोटार सायकली, ७ मोबाईल संच आदी आढळून आले ज्याची किंमत १३ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.