यवतमाळ: जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. विशेषतः आर्णी, दिग्रस आणि उमरखेड तालुक्यांना पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे शेतशिवारात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात शनिवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी सकाळपासून आर्णी, उमरखेड व दिग्रस तालुक्यात या पावसाचा जोर होता. दिग्रस तालुक्यात पावसामुळे मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. यवतमाळ शहरासह अनेक ठिकाणी पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस कोसळत होता. पावसामुळे यवतमाळ शहराच्या काही भागातील वीजही गायब झाली होती.
हेही वाचा… कुख्यात डॉन अरुण गवळी पुन्हा एकदा कारागृहाबाहेर, गवळीला मिळाली संचित रजा
मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यवतमाळ तालुक्यात २९.८ मिलिमीटर, कळंब २६.९. दिग्रस ३३.६, पुसद ३६.१, महागाव ३७.९, बाभूळगाव २७, दारव्हा १५.८, नेर १५.१, मारेगाव १.३, झरी २.३ तर राळेगावसह वणी आणि घाटंजीमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तर जिल्ह्यात आतापर्यंत ९०५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुसद तालुक्यात इसम वाहून गेला
पुसद तालुक्यातील धनसळ येथे नाल्यातील पुरात एक व्यक्ती वाहून गेला. बाळू भीमराव पानपट्टे (रा. धनसळ) असे या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह तालुक्यात पाऊस कोसळला. धनसळ येथील नाल्याला मंगळवारी दुपारच्या सुमारास पूर आला होता. पुलावरुन पाणी असतानाही बाळूने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तोल जाऊन तो वाहून गेला.