करोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर प्रथमच रविवारी चोवीस तासात तब्बल १०५ करोना बाधितांची नागपूर जिल्ह्यात नोंद झाली. यात ८० शहरातील तर २५ ग्रामीण भागातील आहेत.शनिवारी तब्बल ९५ नवीन करोनाग्रस्त आढळले होते व पाच महिन्यानंतर जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. रविवारी मृत्यूची नोंद नसली तरी तब्बल १०५ करोनाबाधितांची भर पडली. ही संख्या तिसऱ्या लाटेनंतरची आतापर्यंतची सर्वाधिक आहे. त्यामुळे करोनाचे संक्रमण हळूहळू का होईना पुन्हा तोंड वर काढत असल्याचे संकेत मानले जात आहे.

शहरात सर्वच सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली असून करोना प्रतिबंधक नियमांचे कोणीही पालन करताना दिसत नाही. विशेषत: पदपथावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे होणारी गर्दी चिंता वढवणारी आहे. मद्य विक्रीची दुकाने, बार, भाजी बाजार तत्सम ठिकाणांहून करोनाचे संक्रमण होण्याचा धोका उद्भवत असतानाही कोणीही या विक्रेत्यांवार कारवाई करीत नाही. त्यामुळे दैनिक रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची नागरिक चर्चा करतात.