गोंदिया: मकरसंक्रांतीचा सण एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात पांढऱ्या, काळ्या तिळाची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीळ आणि गुळाचे भाव दुप्पट वाढल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी १३० ते १५० रुपये किलोने विकला जाणारा तीळ आता २२० ते २४० रुपये किलोवर पोहोचला आहे. दोन वर्षांपूर्वी तिळाच्या किंमती १०० ते १२० रुपये किलोपर्यंत होत्या, त्या आता दुप्पट झाल्या आहेत.

संक्रांतीमुळे तिळाची मागणी वाढली आहे. तर, ग्राहक किंमत कमी होण्याची वाट पहात आहेत. संक्रांतीनिमित्त घरोघरी तिळाचे विविध प्रकारचे पदार्थ, लाडू आणि बर्फी बनवली जाते. काही जण तिळाचे दानही करतात.

हेही वाचा… नागपुरात मराठीबाबत अनास्था!; सात झोनमध्ये केवळ १०२१ प्रतिष्ठानांवर मराठी पाट्या

गोंदियातील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आजकाल मागणी असो वा नसो, सर्व वस्तूंचे भाव साठेबाज ठरवतात. त्यामुळे तिळाच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. सध्या गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील बाजारात गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथून तिळाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. किराणा बाजारात पांढऱ्या तिळाला १८० ते २०० रुपये तर लालसर तीळ २३० ते २४० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुळाचे दरही वाढले

सध्या बाजारात नवीन गुळाची आवक सुरू झाली आहे. त्यातच तिळाचे पदार्थ तयार करण्याचे कामही सुरू झाल्याने गुळाची मागणी वाढली आहे. लाडू आणि गुळाचे प्रमाणही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेलेच आहे. गतवर्षी गुळ ४० ते ४५ रुपये दराने विकला जात होता, तो आता ६० ते ७० रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यामुळे मकर संक्रांतीतील महत्वाचे हे दोन घटक यांच्यावरच महागाईची संक्रांत आली आहे.