नागपूर : तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या भागात नागपूरचाही क्रमांक वरचा आहे. परंतु नागपुरातील मेडिकल रुग्णालयात लिनिअर एक्सिलेटर यंत्र खरेदीचा पेच कायम आहे. सध्या लिनिअर एक्सिलेटर खरेदीनंतरचे देयक रुपये वा डॉलरमध्ये देण्यावरून ही खरेदी रखडली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण खात्याला पुन्हा निविदा काढावी लागत आहे.

नागपूरसह जगभरात कर्करोगावर नवनवीन उपचाराची पद्धत विकसीत होत आहे. एका उपचार पद्धतीत कर्करुग्णांना लाईट देण्यासाठी अद्यावत लिनिअर एक्लिलेटर यंत्राचा वापर होतो. परंतु मेडिकल रुग्णालयात जुन्या कालबाह्य कोबाल्ट यंत्रावरच रुग्णांवर उपचार होतात. मेडिकलला शासनाकडून या यंत्रासाठी वर्ष २०१९ मध्ये २३.२० कोटींचा निधी मिळाला. परंतु तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे खरेदी रखडली आहे.

हेही वाचा >>>नागपूर : छायाचित्रकार विनय पुणेकर हत्याकांड; ‘शूटर हेमंत’ला पंजाबमधून अटक

दरम्यान शासनाने सर्वात आधी लिनियर एक्सिलेटर यंत्र खरेदीसाठी हा निधी हाफकीन या संस्थेकडे वळवला होता. नंतर हा निधी मेडिकलला परत आला. हा निधी शासनाला परत गेल्यावर पुन्हा मेडिकलकडे वळता करण्यात आला. आता या यंत्राची खरेदी वैद्यकीय शिक्षण खाते करणार आहे. या विभागाने काढलेल्या निविदेनंतर काही कंपन्यांनी यंत्र पुरवठ्यात रस दाखवला. परंतु यंत्राची रक्कम डॉलरमध्ये देण्याची कंपन्यांची मागणी होती. वैद्यकीय शिक्षण विभाग मात्र रक्कम रुपयात देण्यास तयार होता. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द झाली. आता पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. या विषयावर एक उच्चस्तरीय बैठकही होण्याचे संकेत आहेत. या विषयावर मेडिकलसह कर्करोग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सगळ्यांनी बोलण्यास नकार दिला. तर एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर डॉलर आणि रुपयांमध्ये यंत्राचे देयक अदा करण्याबाबत लवकरच तोडगा निघण्याची आशा व्यक्त केली.

हेही वाचा >>>यवतमाळच्या धावपटूचा दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड’मध्ये झेंडा, ८६ किलोमीटर अंतर केवळ सात तास चार मिनिट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्करोग रुग्णालयाचे काम सुरू देशातील मुखाचे सर्वाधिक कर्करुग्ण नागपूरसह मध्य भारतात आढळत असल्याचे विविध सामाजिक व शासकीय संस्थांच्या अभ्यासात व सर्व्हेक्षणात पुढे आले आहे. त्याला तंबाखू, गुटखा, पान मसाल्याचे सेवन हेही एक कारण आहे. येथे स्तनासह इतरही कर्करुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. नागपुरात बहुप्रतिक्षित कॅन्सर इन्स्टिट्यूट १८ महिन्यात उभारण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश होते. सन २०१९ मध्ये मुदत संपल्यावरही ते झाले नाही. त्यानंतर न्यायालयाच्या दबावात आता या इन्स्टिट्यूटचे काम नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या टीबी वार्ड परिसरात सुरू आहे. परंतु पावसाळा सुरू झाल्याने आता या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपुरातील कॅन्सर रुग्णालयाचीही घोषणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील आहे. त्यानंतरच्या सगळ्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी या रुग्णालयाची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात काही महिन्यापूर्वी या रुग्णालयाचे काम सुरू झाले, हे विशेष.