राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने या गाडीऐवजी तुलनेने निम्न दर्जाची तेजस एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. अशाप्रकारे उच्च दर्जाच्या रेल्वेला पर्याय म्हणून निम्न दर्जाची रेल्वेगाडी चालवण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.

बिलासपूर-नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ऐवजी रविवारपासून या मार्गावर तेजस एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. तेजस एक्स्प्रेसला ११ डबे असतात तर वंदे भारत एक्स्प्रेस १६ डब्यांची आहे. दोन्ही गाड्यांमधील सुविधांमध्ये व प्रवास भाड्यात तफावत आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे तेजस एक्स्प्रेसपेक्षा अधिक आहेत.

हेही वाचा… बुलढाणा : खांबावर काम करत असताना उच्चदाबाचा विद्युत धक्का लागून युवकाचा मृत्यू

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस म्हणून धावणारी रेल्वेगाडी आता सिकंदराबाद-तिरुपती दरम्यान धावणार आहे. या मार्गावर प्रवाशांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चेअर कार आहे. ही गाडी सुमारे ४१३ किलोमीटरचे अंतर साडेपाच तासात कापते. परंतु रविवार, सोमवार आणि शुक्रवार वगळता या गाडीला अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना देखील सुचवल्या होत्या. परंतु, आता चक्क रेल्वेगाडीच बदलण्यात आली आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवास भाडे परत करू

“हा तात्पुरता बदल आहे. आधी तिकीट काढलेल्या प्रवाशांना दोन गाड्यांच्या प्रवास भाड्यात जो फरक असेल, त्याचा परतावा करण्यात येईल. तसेच ज्यांना तेजस एक्स्प्रेसने प्रवास करायचा नाही त्यांना संपूर्ण प्रवास भाडे परत केले जातील.” – साकेतकुमार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे.