नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू पद प्रभारींच्या भरवशावर होते. आठ महिन्यांपासून नवीन कुलगुरू निवडीसाठीची समिती गठित होत नव्हती. आता अखेर राज्यपालांनी समिती गठित केली आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून लवकरच कुलगुरू निवड प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रभारी कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांनी दहा महिने पदभार सांभाळल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खाेडे-चवरे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला. त्यालाही दोन महिने झाले. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार आणखी किती काळ अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
विद्यापीठ अनुदान आयाेग (यूजीसी) कुलगुरू पदासाठीची अर्हता बदलणार असल्याची चर्चा होती. तसेच उद्याेग क्षेत्र किंवा खासगी संस्थेतील व्यक्तीही कुलगुरू पदासाठी पात्र ठरू शकणार होते. यूजीसीच्या या धाेरणाच्या मंजुरीसाठी विद्यापीठाची कुलगुरू निवड प्रक्रिया थांबवण्यात आली, अशीही चर्चा होती. मात्र, यूजीसीने नियमात कुठलाही बदल केला नसून राज्यपालांकडून कुलगुरू निवड समिती गठित करण्यात आली आहे. दक्षिण भारतातील एका विद्यापीठाच्या निवृत्त संचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित झाल्याची माहिती आहे.
निवड प्रक्रिया कशी चालते?
निवड समितीची पहिली बैठक झाल्यानंतर कुलगुरू पदाच्या अर्ज प्रक्रियेबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जांची छाननी करून समिती उमेदवारांना मुलाखतीसाठी बाेलावेल. त्यापैकी याेग्य अर्हताप्राप्त पाच उमेदवारांची निवड करून पुढच्या प्रक्रियेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. राज्यपाल कार्यालयाद्वारे मुलाखती घेतल्यानंतर कुलगुरू पदावर नियुक्ती केली जाईल.
निवड समितीचे स्वरूप कसे?
कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांना शिफारस करण्याकरिता समिती स्थापन करण्यात येते. यामध्ये राज्यपाल तथा कुलपतींनी नामनिर्देशित केलेला सदस्य असताे. सदस्य एकतर सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश असतात किंवा राष्ट्रीय कीर्तीचा ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ किंवा पद्म पुरस्कारप्राप्त शिक्षणतज्ज्ञ असू शकताे. हाच सदस्य या समितीचा अध्यक्ष असताे. दुसरे सदस्य हे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव किंवा शासनाचे नामनिर्देशित प्रधान सचिव स्तराचे अधिकारी असतात. तिसरा सदस्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व शैक्षणिक परिषदेने नामनिर्देशित केलेली व्यक्ती असते.