नागपूर : पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली होती. त्यानंतर एमपीएससीने जाहीरात काढली. यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी अर्जही केले आहे. परंतु, या पदासाठी जाहीरात केलेल्या उमेदवारांसमोर एक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काय प्रकार आहे ते पाहूया.

पशुधन विकास अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोकमार्फत (एमपीएससी) भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण २७९५ जागांसाठी ही भरती आहे. ज्यात गट अ संवर्गातील पदांचा समावेश आहे. २९ एप्रिल ते १८ मे दरम्यान यासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत १८८६ पदे भरलेली असून २७९८ पदे रिक्त आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०२५ अखेर ८ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत, अशी एकूण २८०६ पदे रिक्त होणार आहेत.

ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. या गोष्टीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी पाठपुरावा करून पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला. यापैकी सरळसेवा जाहिरात क्र. १२/२०२२ मधील प्रतिक्षायादीतील ११ पदे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २७९५ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही रिक्त पदे भरल्यानंतर विभागाचे कामकाज अधिक वेगाने होऊन ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला होता. परंतु, इतिहासात पहिल्यांच इतक्या पदांची जाहिरात आली आहे. त्यामुळे पशुधन विकास अधिकारी पदाच्या जाहिरातीवर आता कृषी पदवीधारकांचेही लक्ष लागले आहे. पशुवैद्यकांच्या पदवीप्रमाणे बी.एसस्सी. ऍग्री हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये बरेच साम्य असते. त्यामुळे कृषी पदवीधरांनाही अर्जाची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.