यवतमाळ : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव साजरा होत असलेल्या यवतमाळ शहरात या उत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी तरूणाच्या हत्येने खळबळ उडाली. जुन्या वादातून तरूणाच्या हत्येची ही घटना आज मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्थानिक जांब मार्गावर घडली. गौरव विलास बावने (२७) रा. एसटी कॉलनी, जांबरोड, यवतमाळ असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी स्वप्नील दत्तात्रय सुलभेवार (३७) रा. मणीयार ले-आऊट, यवतमाळ या आरोपीस पोलिसांनी अटक केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी विलास बावने रा. एसटी कॉलनी, जांबरोड, यवतमाळ यांनी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार, शहरातील जांब रोडवर बावने यांनी पान टपरी आहे. त्यांनी या टपरीच्या बाजूला अग्रवाल नामक व्यक्तीला दुसरी पान टपरी बनवून दिली होती. ती टपरी अग्रवाल याने स्वप्नील सुलभेवार याला चालवायला दिली होती. तीच टपरी स्वप्नील याने एका चहा टपरी वाल्याला भाड्याने दिली होती. त्याचे भाडे स्वप्नील घेत असल्याने गौरव आणि स्वप्नील यांच्यात वाद सुरू होता.

रविवारी रात्री आदीत्य चव्हाण हा पान टपरीच्या मागे सिगारेट पिण्यासाठी जात होता. यावेळी गौरव याने तू या ठिकाणी सिगारेट पीत जावू नको, असे बोलल्याने त्यांच्या थोडा वाद झाला होता. दरम्यान सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विलास बावने आणि त्यांचा मुलगा गौरव जांब मार्गावर उभे असताना त्यांनी आदित्यला गौरव आणि तू आपसात वाद करू नका असे सांगितले. अश्यात स्वप्नील त्या ठिकाणी आला आणि बावने यांना शिवीगाळ करू लागला. तसेच गौरव याच्यावर चाकू हल्ला केला. दरम्यान विलास बावने यांनी धाव घेत गौरव याला रूग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मारेकरी स्वप्नील सुलभेवार याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले. स्वप्नीलरने चाकूहल्ला केल्यानंतर गौरवनेही प्रत्युत्तरादाखल लोखंडी रॉडने स्वप्नीलवर वार केला. यात हमारेकरी स्वप्नीलही जखमी झाला आहे. खूनाच्या घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी ठाण्याचे निरीक्षक नरेश रणधीर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही तासातच मारेकरी स्वप्नील सुलभेवार याला अवधुतवाडी डिबी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.

सहा दिवसांपूर्वीच शहरालगत लोहारा येथे भाडेकरूने घरमालकाची हत्या केल्याची घटना घडली होती. जंगलुजी वालोजी आडे (७०) असे मृताचे नाव असून करण विनायक घोरपडे (२१) रा. गोपालनगर, लोहारा असे मारेकरी भाडेकरूचे नाव आहे. आता ऐन नवरात्रोत्सवात खुनाची घटना घडल्याने भक्तीमय वातावरणात शांतता भंग झाल्याची चर्चा आहे.