नागपूर : राज्याने सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि खर्रावर बंदी घातली आहे. तरीही त्याची बेधडक विक्री करणाऱ्या तिघांना ताब्यात घेत सदर आणि गुन्हे शाखा पाचच्या पथकाने १ हजार २६५ किलो सुगंधीत तंबाखू, १५ किलो खर्रा, तंबाखू जन्य पदार्थ आणि सुपारी घोटण्यासाठी वापरले जाणारे ८ मिक्सर जप्त केले. संगंधीत तंबाखू पासून गुटखा आणि खर्रा तयार करणारा कारखाना देखील पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

अज्जू राजेंद्रप्रसाद यादव (२५, रा. बैरमजी टाऊन, खदान), मोहम्मद हसिन मोहम्मद शगीर (३६) आणि त्याचा भाऊ शेरू उर्फ तहसीन शगीर अहमद (३७) अशी प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू आणि गुटखा विक्री करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सदर पोलिसांनी अज्जू यादव याच्यावर कारवाई करत १५ किलो खर्रा, तो बनवण्यासाठी वापरले जाणारे ८ मिक्सर असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर गुन्हे शाखा पथक पाचनने हसीन आणि तहसीन या दोन भावांकडून १२६५ किलो सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पानमसाला असा ५ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

इटारसी पुलाजवळ गोंडवाना चौकातल्या रिझर्व्ह बँकेच्या वसाहतीला लागून असलेल्या घरातून अज्जू यादव हा मशीनद्वारे खर्रा तयार करून त्याच्या पुड्या विकत असल्याचा सुगावा सदर पोलिसांना लागला होता. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने तिथे छापा टाकत अज्जू यादव याच्या ताब्यातून १५ किलो खर्रा जप्त केला. गुन्हे शाखा पथक पाचने नारा मार्गावरील उप्पलवाडीतल्या कारखान्यावर छापा टाकत १ हजार २६५ किलो प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचा साठा बाळगत बेकायदेशीररित्या गुटखा आणि पानमसाला तयार करणारा कारखाना उघडकीस आणला. अन्न व औषध प्रशानाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना खंदारे यांच्या तक्रारीवरून कपीलनगर पोलिसांनी कारखाना चालवणारे हसीन शगीर आणि त्याचा भाऊ तहसीन शगीर या दोघांवर गुन्हा दाखल केला. तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.