लोकसत्ता टीम
चंद्रपूर: परिश्रम, ध्येय व सातत्यपूर्ण अभ्यासाची तयारी असेल तर, कोणत्याही यशाला गवसणी घालता येते. हे ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी कुटुबांतील तीन विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखविले आहे. तिघांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नसतांनाही जिद्द, सातत्य आणि कष्ट उपसण्याची तयारी या त्रिसुत्रीच्या भरोवशावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उर्तीण करून यश संपादन केले आहे. या तिघांचीही यशोगाथा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरात शिकवणी लावून स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते. या समजुतीला यानिमित्ताने ब्रम्हपुरीतील तिघांनी फाटा दिला. ब्रह्मपुरी तालुक्यातील कन्हाळगाव येथील दीपाली काकाजी मिसार हिेने नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाच्या खासगी अभ्यासिकेत अभ्यास करून यश मिळविले आहे. दिपालीच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. वडिलांकडे फक्त चार एक शेती आहे. तुटपुंज्या मिळकतीतसुद्धा वडिलांनी दीपालीच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. नेहमीच प्रोत्साहन दिले. तिचे चौथ्या वर्गापर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर गावापासून आठ किमी अंतरावरील ब्रह्मपुरी शहरातील नेवजाबाईत प्रवेश घेतला. तेव्हापासून ती सायकलने प्रवास करुन शाळेत यायची. सायकल प्रवास करून तिने शिक्षण पूर्ण केले. सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. युट्युबवरून स्पर्धा परीक्षेची पद्धत समजून घेतली. त्यानंतर अभ्यास सुरु केला. रोज आठ किमी. सायकलने येऊन ती दिवसभर अभ्यास करायची. ब्रह्मपुरीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका खासगी शिकवणी वर्गात तिने प्रवेश घेतला. वयाच्या अवघ्या २६ वर्षी तिने यश पदरात पाडले. यापूर्वी तिने तलाठी परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्यस्थितीत ती चिमूर तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहे.
तसेच ब्रह्मपुरी शेवटच्या टोकावर तालुक्याच्या जंगलव्याप्त भागातील बल्लारपूर या छोट्याशा गावातील डिसेंबर राजीराम दिवटे यानेसुध्दा एमपीएससीमध्ये यश संपादन केले आहे. डिसेंबरने चौथ्या वर्गांपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. त्यानंतर ५ ते १० वीपर्यंत मुझसा येथील शाळेत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १२ वीपर्यंतचे गडचिरोली येथे झाल्यानंतर पदवीचे शिक्षण त्याने ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात घेतले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे गाठले. तिथेच अभ्यास करून परीक्षा दिल्या. सुरवातीला यश मिळाले नाही. मात्र, खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी पोलिस उपनिरीक्षकाची परिक्षा उत्तीण केली.
तालुक्यातील मेंडकी येथील गायत्री नामदेव जांभुळकर हिनेसुध्दा पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत बाजी मारली आहे. गायत्रीचे वडील मजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकायचे. गायत्री अभ्यासत हुशार होती. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे गायत्रीला अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पुण्यातील खासगी कंपनीत नोकरी केली. सोबतच पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. स्पर्धा परिक्षेची शिकवणी न लावता परिक्षेचा अभ्यास सुरु केला. शेवटी तिला त्यात यश आले. ती लवकरच पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू आहे.