बुलढाणा : पोलीस विभागातील उल्लेखनीय कामगिरी बद्धल पोलीस महासंचालक पदक देण्यात येते. हा पुरस्कार पोलीस विभागात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जातो. यंदाच्या वर्षासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचारी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याचा तर दोन पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यांना उद्या १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी बुलढाणा येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पोलीस महासंचालक पदकसाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील, बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलिस हवालदार राजू आडवे व पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस हवालदार सुनिल जाधव यांचा समावेश आहे. या तिघांना उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे पदक बहाल केले जाते.यापैकी संग्राम पाटील यांनी गेल्या १५ वर्षांत पुणे ग्रामीण, बुलढाणा, अकोला, मुंबई आदी भागांत उत्कृष्ट सेवा बजावली असून त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. सध्या चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणून ते कार्यरत आहे. यापूर्वी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील धाड, धामणगाव बढे, साखरखेर्डा पोलीस ठाणे येथे ठाणेदार म्हणून काम केले आहे. तिथे कार्यरत असताना त्यांनी स्थानिक नागरिकांशी उत्कृष्ट समन्वय साधत ‘सोशल पोलिसिंग’चे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.
सायबर गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता बुलढाण्यात काही वर्षांपूर्वी स्वतंत्र सायबर ठाणे कार्यान्वित करण्यात आले. तसेच तांत्रिक विश्लेषण कक्ष कार्यरत आहे. या कक्षात कार्यरत पोलीस हवालदार राजू आडवे यांनी सायबर गुन्हेच नव्हे तर पारंपरिक गुन्ह्यातील उकल करण्यात मोठा हातभार लावला आहे. गुन्ह्यातील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या कार्याची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली असून महासंचालक पदक साठी राजू आडवे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पोलीस ठाणे, वरिष्ठ अधिकारी, नागरिक यांच्यात समन्वय साधणारा विभाग म्हणजे पोलीस नियंत्रण कक्ष होय. एरवी ‘साईड ब्रँच’ समजल्या जाणाऱ्या पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस हवालदार यांनी उत्कृष्ट सेवा दिली. याबद्धल ते पोलीस महासंचालक पदकाचे मानकरी ठरले आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही निवड केली आहे. त्यांच्या या सन्मानासाठी जिल्हाभरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.बुलढाणा येथील पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस कवायत मैदानात गुरुवारी सकाळी ९ वाजता हा सोहळा पार पडणार आहे. या समारंभाचे हे तीन पोलीस कर्मचारी मुख्य आकर्षण ठरणार आहे.