नागपूर : हिवाळ्याची चाहूल लागताच मध्य भारतातील वाघांच्या नैसर्गिक स्थलांतरणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच महाराष्ट्रातील एका वाघाने प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणात प्रवेश केला. कॅमेरा ट्रॅपसह इतर पद्धतींचा वापर करुन त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

आईपासून वेगळ्या झालेल्या बछड्यांकडून हिवाळ्यात अधिक नैसर्गिक स्थलांतरण केले जाते. जोडीदाराचा शोध आणि अधिवासाच्या शोधात ते बाहेर पडतात. यातून समृद्ध कॉरिडॉरची देखील ओळख पटते. याच क्रमात एक वाघ महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्यातून आसिफाबाद जिल्ह्यातील कागजनगर कॉरिडॉरमध्ये स्थलांतरित झाला.

महाराष्ट्रातील राखीव क्षेत्रातील वाघांसाठी हा प्रसिद्ध कॉरिडॉर मानला जातो. कागजनगर वनविभागाचा हा एक भाग आहे. ४० ते ५० किलोमीटर अंतरावर वाघ फिरत आहे. मंचेरियल वनक्षेत्राजवळ त्याला शेवटचे पाहिल्याचे सांगितले जाते. कॅमेरा ट्रॅपसह इतर पद्धतींचा वापर करून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

गेल्यावर्षी चारपेक्षा अधिक वाघ या प्रदेशात स्थलांतरित झाले होते. त्यातील एक वाघ तेलंगणातील सिद्धिपेटपर्यंत प्रवास करून मूळ प्रदेशात परतला होता. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वाघ वैनगंगा नदी ओलांडून तेलंगणात गेले व त्यातील काही वाघ परत देखील आले. मध्य प्रदेशातील चार वाघ हिवाळ्याच्या कालावधीतच महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात आले होते. नागझिऱ्यातील प्रिन्स, आयत या वाघांचेही स्थलांतरण याच काळातील आहे.

पावसाळ्यानंतर अनुकूल परिस्थिती

हिवाळा हा वाघांच्या नैसर्गिक स्थलांतरणाचा काळ आहे. पावसाळा संपल्यानंतर शेतातील पिके थोडी मोठी होतात आणि स्थलांतरणासाठी वाघांना आधार मिळतो. दिवसा मुक्काम आणि रात्री भ्रमंती असे वाघांचे स्थलांतरणाचे वेळापत्रक असते. उन्हाळ्यात सारे ओसाड असल्याने या काळात वाघ स्थलांतर करत नाहीत. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांच्या स्थलांतरणाला सुरुवात होते.

पावसाळा संपल्यानंतरचा ऋतू हा वाघांच्या स्थलांतरणासाठी उत्तम काळ आहे. आठ ते दहा किलोमीटरपर्यंत जंगल नसतानाही स्थलांतरणासाठी वाघ शेती, नदीनाल्यांचा वापर करतात. वाघांना त्यांचे ‘शॉर्टकट्स’ माहिती असतात. २०० ते ६००-७०० मीटरपर्यंत नदीचे पात्र ओलांडून वाघ स्थलांतर करतात. जगप्रसिद्ध ‘जय’ या वाघाने नागझिऱ्यातून स्थलांतर करताना गोसीखुर्दचा कालवा पार केला होता. हिवाळ्यात स्थलांतरणासाठी अनुकूल परिस्थिती (अन्न, पाणी, लपण्यासाठी जागा) असल्याने ते स्थलांतर करतात. – सावन बाहेकर, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया