नागपूर : अलीकडेच महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात वाघिणीने सहा बछड्यांना जन्म दिल्याची घटना उघडकीस आली. आता पुन्हा एकदा नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानात एका वाघिणीने सहा बछड्याना जन्म दिला आहे. प्राणीसंग्रहालयाच्या प्रजनन कार्यक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सोमवारी दिल्लीतील राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानात रॉयल बंगाल वाघीण अदितीने सहा बछड्यांना जन्म दिला. दोन अयशस्वी प्रजनन प्रयत्न आणि आठवड्यांच्या देखरेखीनंतर हे बछडे जन्माला आले. सुमारे सात ते आठ वर्षांची ही वाघीण २०२१ मध्ये नागपूरमधील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधून आणली होती.

आदितीला आधी रॉयल बंगाल वाघ करण आणि नंतर हरी यांच्यासोबत जोडण्यात आले होते, परंतु दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाले. मात्र, २१ एप्रिल रोजी यशस्वी वीण झाली. अदितीच्या गरोदरपणाची पुष्टी २६ मे रोजी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, पुणे येथून आली. यानंतर अदितीच्या वाघिणीकडे विशेष लक्ष देण्यात आले. तिला बारकाईने निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि तिच्या पिंजऱ्यात असलेल्या इतर वाघांना वेगळ्या कक्षात हलवण्यात आले. सोमवारी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान प्राणीसंग्रहालयात वाघिणीने पिल्लांना जन्म दिला. ही तिची पहिलीच आईहोण्याची वेळ आहे. तिने सहा जिवंत बछड्यांना जन्म दिला आहेत आणि ती त्यांची काळजी घेत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत २४ तास देखरेख ठेवली जात आहे आणि शिफ्टमध्ये समर्पित कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

२०२३ मध्ये, प्राणीसंग्रहालयात आदितीची बहीण सिद्धीला पाच रॉयल बंगाल वाघांचे पिल्ले जन्माला आले आणि त्यापैकी दोन जिवंत राहिले. १८ वर्षांत पहिल्यांदाच दिल्ली प्राणीसंग्रहालयात सोनेरी रॉयल बंगाल वाघिणीने जन्म दिला. दरम्यान प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की ते प्राण्यांच्या पिंजऱ्याचा विस्तार करण्याची योजना आखत आहेत. आदितीची गर्भधारणा निश्चित झाल्यानंतर तिच्यावर ताण येऊ नये म्हणून आधीच सुरू झालेले बांधकाम काम थांबवण्यात आले.

दिल्ली प्राणीसंग्रहालय ही रॉयल बंगाल वाघांसाठी समन्वित संवर्धन प्रजनन कार्यक्रमात सहभागी संस्था आहे, ज्यामध्ये संस्थांमध्ये प्राण्यांच्या देवाणघेवाणीद्वारे अनुवांशिक विविधता सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. आदितीच्या बछड्यांसह, दिल्ली प्राणीसंग्रहालयात वाघांची संख्या आता लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्याठिकाणी आधीच १३ वाघ होते, त्यापैकी सहा पांढऱ्या रंगाचे वाघ होते. २०२३ मध्ये, प्राणीसंग्रहालयाने अवनी आणि व्योम या पांढऱ्या वाघांच्या शावकांचे स्वागत केले. सात वर्षांच्या अंतरानंतर त्यांच्या जन्माने प्राणीसंग्रहालयाच्या प्रजनन कार्यक्रमात एक महत्त्वाचा टप्पा गाठला.