नागपूर : टिपेश्वर अभयारण्यातील उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे याठिकाणी वाघांची संख्या वाढत आहे. मात्र, वाढणाऱ्या वाघांच्या तुलनेत अधिवास कमी पडत असल्याने येथून वाघ बाहेर पडत आहेत. त्याचाच फायदा शिकारी घेत असल्याचे नुकतेच वाघिणीच्या गळ्यात अडकलेल्या फासवरून स्पष्ट झाले आहे. राज्यातील वाघांवर बहेलिया शिकाऱ्यांचे संकट गडद झाले असताना या घटनेने राज्यातील वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टिपेश्वर अभयारण्यात वाघांची सर्वाधिक संख्या आहे. येथील वाघ संपूर्ण राज्यात स्थलांतर करीत आहेत. तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिकचा प्रवास या अभयारण्यातील वाघांनी केला आहे.

दरम्यान, या अभयारण्यात गेल्या दोन दिवसांपासून “पीसी”नावाच्या वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास अडकला आहे. त्यामुळे या वाघिणीच्या गळ्यावर मोठी जखम झाली असून, ही वाघीण मदतीसाठी भटकत आहे. वनखात्याला मात्र आज या घटनेची माहिती मिळाली आणि खात्याचे पथक त्याठिकाणी रवाना झाले. वाघिणीचे हे छायाचित्र एका वन्यजीव छायाचित्रकार पर्यटकाने टिपल्यानंतर हा प्रकार पुढे आला आहे. स्थानिक शिकाऱ्यांचा धोका या अभयारण्याला सुरुवातीपासूनच आहे. ससे, हरीण आदी वन्यप्राण्यांच्या शिकारी याठिकाणी होतच असतात. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्यात वाघाची संख्या वाढत असली तरी त्यांना सुरक्षित वातावरण देण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिशय कमी जंगल क्षेत्रात मोठ्या संख्येने वाघ वास्तव्याला असल्याने आजूबाजूच्या शेतशिवारातही ते फिरताना दिसतात. दरम्यान, या वाघिणीला उपचार न मिळाल्यास तिच्या जीवाला धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अभयारण्याचा विस्तार करावा, वाघांसाठी संरक्षित क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, अशी वारंवार मागणी शासन दरबारी झाली आहे. परंतु त्याकडे अजूनही लक्ष देण्यात आले नाही. स्थानिक यंत्रणाही मर्यादित साधनांचासुद्धा पुरेपूर वापर करताना दिसत नाही. यामुळे “पीसी” वाघिणीसारखे प्रसंग इतर वाघांवरही ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही जखमी वाघीण फासात अडकलेली मान कोण मोकळी करते या प्रतीक्षेत भटकत आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास तिच्या जीवाला धोका आहे. वन विभागाच्या स्थानिक यंत्रणेने याबाबत सतर्कता दाखविण्याची मागणी होत आहे. अलीकडेच चंद्रपूर जिल्ह्यातून बहेलिया शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांनी मोठ्या प्रमाणात वाघांच्या शिकारी केल्याची माहिती आहे. त्यांनतर अकोला येथे दोन दिवसांपूर्वी बिबट सापळ्यात अडकलेला आढळला. तर आता यवतमाळ मध्ये वाघीण फासात अडकल्याने वाघाच्या शिकारीचा धोका वाढला आहे.