अमरावती : तिरूपती बालाजी हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि दिवाळीसारख्या सणांनिमित्त भाविकांची गर्दी वाढते. राज्यातील अनेक शहरांमधून तिरूपती येथे जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध असली, तरी भारतीय रेल्वेतर्फे विशेष एक्सप्रेस गाड्या देखील चालवण्यात येत आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेतर्फे चालविण्यात येत असलेल्या तिरूपती-अकोला-तिरूपती या विशेष गाडीला मुदतवाढ देण्यात आली असून गाडी क्रमांक ०७६०६ अकोला-तिरूपती ही विशेष गाडी २९ जून २०२५ पर्यंत चालणार होती. आता या गाडीला ६ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर रविवारी सकाळी ८.१० वाजता अकोला रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता ती तिरूपतीला पोहचेल. तसेच गाडी क्रमांक ०७६०५ तिरूपती-अकोला ही विशेष गाडी २७ २०२५ पर्यंत चालणार होती.
आता या गाडीला ४ जुलै २०२५ ते २७ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर शनिवारी तिरूपतीहून दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता अकोला येथे पोहचेल.
अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हुजूर साहिब नांदेड ते तिरूपती दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०७१८९ नांदेड- तिरूपती ४ जुलै ते २५ जुलै दरम्यान धावणार असून शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता नांदेडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता तिरूपतीला पोहचेल. गाडी क्रमांक ०७१९० तिरूपती-नांदेड ५ जुलै ते २६ जुलै दरम्यान धावणार असून दर शनिवारी दुपारी २.२० वाजता तिरूपतीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता नांदेडला पोहचेल.
याशिवाय गाडी क्रमांक ०७०१५ नांदेड-तिरूपती ५ जुलै ते २६ जुलैपर्यंत धावणार असून दर शनिवारी दुपारी ४.५० वाजता नांदेडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१० वाजता तिरूपतीला पोहचेल. गाडी क्रमांक ०७०१६ तिरूपती नांदेड ही गाडी ६ जुलै ते २७ जुलै दरम्यान धावणार असून दर रविवारी दुपारी ४.४० वाजता तिरूपतीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता नांदेड येथे पोहचेल. दोन्ही विशेष गाड्यांच्या एकूण १६ फेऱ्या होणार आहेत.
याशिवाय १२७६६ अमरावती-तिरूपती ही आठवड्यातून दोन दिवस धावणारी एक्सप्रेस भाविकांसाठी उपलब्ध आहे. ही गाडी अमरावतीहून दर सोमवार, गुरूवारी धावते, तर परतीसाठी १२७६५ ही गाडी मंगळवार, शनिवारी धावते.