नागपूर : राज्यातील दोन व्याघ्रप्रकल्पांमधील वाघांच्या अंतर्गत स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, या स्थलांतरणाला स्थानिक पर्यटक वाहनचालक, मार्गदर्शक यांनी विरोध केला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ज्या दोन वाघिणी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरीत करण्यात येणार आहेत, त्या गर्भवती असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

केंद्राच्या परवानगीनंतर राज्यातील या पहिल्याच स्थलांतरण प्रक्रियेला आता सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी खडसंगी परिसरातील दोन वाघिणींची ओळख पटवण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील खडसंगी परिक्षेत्र बफर पर्यटनात असणाऱ्या ‘चंदा’ आणि ‘चांदणी’ या तीन ते चार वर्षांच्या दोन वाघिणींचे स्थलांतर सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात करण्यात येणार आहे. मात्र, या दोन्ही वाघिणींचे अलीकडेच ‘बली’ नावाच्या वाघासोबत नैसर्गिक मिलन झाले असून त्या गर्भवती असल्याचा दावा पर्यटक वाहनचालक व मार्गदर्शकांनी केला आहे. या दोन्ही वाघिणींने त्यांचा अधिवास निश्चित केला असून त्यांच्याव्यतिरिक्त या परिसरात इतर वाघ किंवा वाघाचे अस्तित्त्व नाही.

गर्भावस्थेतील या वाघिणींचे स्थलांतर झाले तर त्यांच्या गर्भाला धोका निर्माण होऊन जिवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. सध्या पर्यटन क्षेत्रात ‘झरणी’ या वाघिणीला सुमारे एक वर्षाचे बछडे असून ‘बबली’ वाघिणीलासुद्धा तीन महिन्याचे चार बछडे आहेत. तर ‘नयनतारा’ वाघिणीला देखील अलीकडेच बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे ‘चंदा’ व ‘चांदणी’ या दोन्ही वाघिणीला स्थलांतरित केल्यास त्यांच्यासोबत मिलन करणारा वाघ वाघिणीच्या शोधात ‘बबली’, ‘झरणी’, ‘नयनतारा’ यांच्या अधिवासात जातील. या परिस्थितीत त्यांच्या बछड्यांच्या जिवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो.

या परिसरात आधी ‘छोटा मटका’या वाघाचे वास्तव्य होते. त्यामुळे बफर क्षेत्रातील पर्यटनाचा ओघ इकडेच होता. हा वाघ जेरबंद झाल्यामुळे आणि या क्षेत्रातील काही वाघिणी व वाघ गाभा क्षेत्राकडे स्थलांतरीत झाल्यामुळे ‘चंदा’ व ‘चांदणी’ या दोन वाघिणींनी पर्यटकांना आकर्षित केले आहे. त्याही येथून गेल्या तर पर्यटक या बफरक्षेत्राकडे पाठ फिरवतील आणि त्याचा परिणाम पर्यटक वाहनचालक, मार्गदर्शक यांच्या रोजगारावर देखील होणार आहे. या दोन्ही वाघिणीच्या नैसर्गिक मिलनाचे पुरावे देखील त्यांनी खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसमोर सादर केले. या स्थलांतरणामुळे निसर्गावर होणाऱ्या दुष्परिणामाचा व सर्व पर्यटक वाहनचालक व मार्गदर्शकांवर होणाऱ्या परिणामाचा विचार करुन हे स्थलांतर थांबवावे. अन्यथा अलिझंजा, नवेगाव, निमढेला बफर प्रवेशद्वारावरील सर्व पर्यटक वाहनचालक व मार्गदर्शक बेमूदत संपावर जातील असा इशारा देखील त्यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या उपसंचालकांना व क्षेत्रसंचालकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.