प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत स्थापना; पोलीस आयुक्तांची माहिती

शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून प्रत्येक परिसरातील वाहतूक समस्या वेगवेगळया आहेत. त्यामुळे आता नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील नागरिकांचा व्हॉट्स अ‍ॅपवर ‘ट्रॅफिक क्लब’ निर्माण करण्यात येणार असून एक वाहतूक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी त्या क्लबचा ‘अ‍ॅडमिन’ असेल. या उपक्रमाची सुरुवात झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपूरचा विकास झपाटय़ाने होत आहेत. शहरही फुगत चालले आहे. वाहनांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत शहरातील वाहतूक व्यवस्थेला एक शिस्त असावी आणि नागरिकांना वाहतुकीची समस्या भेडसावू नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरिता नागरिकांना शिस्त आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने उचलण्यात आलेले पाऊल आतापर्यंत यशस्वी झाले असून हेल्मेटच्या अंमलबजावणीला नागपूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता ९० टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात. आता परिसरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी ‘एन ट्रॅक’ हा उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत ‘नागपूर ट्रॅफिक क्लब’ची सुरुवात करण्यात आली आहे, अशीही माहिती डॉ. व्यंकटेशम यांनी दिली.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त आणि त्यांच्या अंतर्गत पाच परिमंडळांतर्गत पाच चेंबर कार्यालये आहेत. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कार्यरत असून त्यांच्या हाताखाली अनेक कर्मचारी आहेत. प्रत्येक ठाण्याच्या अनुषंगाने वाहतूक कर्मचारी नेमण्यात आले असून त्यांना नागरिकांचे व्हॉट्सअ‍ॅपवर ‘ट्रॅफिक क्लब’ निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्या क्लबमध्ये नागरिकांनी परिसरातील अपघात, वाहतूक कोंडी आणि इतर समस्या सांगाव्यात आणि उपाय सुचविवावे, असे आवाहन डॉ. व्यंकटेशम यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी, परिमंडळ-२ चे उपायुक्त राकेश ओला आणि वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदस्य होण्यासाठी येथे संदेश पाठवा

‘ट्रॅफिक क्लब’चा सदस्य होण्यासाठी नागरिकांनी ९०११३८७१०० या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आपले नाव, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि राहण्याचे ठिकाण याची माहिती कळवावी. त्यांना त्या परिसरातील क्लबसोबत जोडण्यात येईल. त्यानंतर ते संबंधित क्लबवर ते वाहतूक समस्यांवर चर्चा करू शकतील आणि वाहतूक अधिकारी व कर्मचारी त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील.

गुन्हेगारी पाश्र्वभूमी नको

‘ट्रॅफिक क्लब’मध्ये पोलीस ठाण्याच्या परिसरातील नागरिकांना जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या क्लबशी जुळणारे व्यक्ती प्रतिष्ठित असावेत. क्लबमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाची गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासण्यात येईल. त्यानंतर त्यांना सदस्य करण्यात येईल.