लोकसत्ता टीम

नागपूर : शहरातील गजबजलेला परिसर म्हणून संविधान चौक, एलआयसी चौक, कस्तुरचंद पार्क, मोहिनी कॉम्पलेक्स आणि स्मृती टॉकिज चौकांची ओळख आहे. या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून तीन उड्डाणपूल निर्माण करण्यात आले. मात्र, याच परिसरात तीनही उड्डाणपुलांची ‘लँडिंग’ असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे.

काटोल नाका चौकातून सुरु होणारा उड्डाणपूल सदरमधील कस्तुरचंद पार्कसमोर उतरतो. त्यामुळे उड्डाणपुलावरून येणारी सर्व वाहने संविधान चौक किंवा ‘यू-टर्न’ घेऊन सदरमध्ये जातात. तर मेयो रुग्णालयापासून सुरू होणारा उड्डाणपूल संविधान चौकात उतरतो तर एका बाजूने एलआयसी चौकात पुलाची ‘लँडिंग’ आहे.

आणखी वाचा-कोजागिरी! पोर्णिमेच्या रात्री सूपरमून दर्शन, असा आहे दुग्धशर्करा योग

नुकताच ऑटोमोटिव्ह चौक, कामठी, रामटेक आणि जबलपूरकडून येणाऱ्या वाहनांना शहरात पोहचण्यासाठी नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला. त्या पुलाचे उद्घाटन नुकतेच झाले. त्या उड्डाणपुलाची ‘लँडिंग’सुद्धा एलआयसी चौकात आहे. त्यामुळे संविधान चौक-एलआयसी चौक किंवा कस्तुरचंद पार्क चौकात तीन उड्डाणपुलांची ‘लँडिंग’ असल्यामुळे शहरातील तीन बाजूने येणारी वाहने याच परिसरातून जातात. त्यामुळे या परिसरात दिवसभर वाहनांची गर्दी असते. या तीनही चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी उड्डाणपुलांची निर्मिती करण्यात आली. मात्र, उड्डाणपुलांवरून येणारी वाहने एकाच परिसरात गोळा होत असल्यामुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडली आहे. त्यामुळे या भागात निर्माण केलेल्या तीन उड्डाणपुलांचा उपयोग कमी आणि अडचण जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे.

उड्डाणपुलाच्या ‘लँडिंग’समोर वाहनांच्या रांगा

कामठी-ऑटोमोटिव्ह चौकातून येणाऱ्या वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या नवनिर्मित उड्डाणपुलाच्या एलआयसी चौकातील ‘लॅँडिंग’समोरील खुल्या जागेवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे उड्डाणपुलावरून भरधाव येणाऱ्या वाहनांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पुलासमोरच हातठेलेसुद्धा सुरु झाले आहेत. येत्या काळात पुलावर चढतानासुद्धा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

आणखी वाचा-काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत गोंधळ; पर्यवेक्षकासमोरच खासदार-आमदार समर्थक भिडले

वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव

सदर उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक थेट कस्तुरचंद पार्क समोरून संविधान चौकाकडे किंवा ‘यू टर्न’ घेऊन स्मृती टॉकिजकडे जाते. तसेच डबलडेकर उड्डाणपुलावरील वाहतूकही एलआयसी चौकातून स्मृती टॉकिजकडे, संविधान चौक किंवा रेल्वेस्थानकाकडे वळते. मेयो रुग्णालयासमोरून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलाची ‘लँडिंग’सुद्धा संविधान चौकात होते. त्यामुळे या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होते. उड्डाणपुलाची ‘लँडिंग’ काढताना वाहतुकीच्या कोंडीचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे या परिसरात वाहतुकीचे योग्य नियोजन न झाल्याची अनेकांची ओरड आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन उड्डाणपुलांची ‘लँडिंग’ एकाच परिसरात आल्यामुळे वाहनांची संख्या वाढली. कामठीकडून उतरणारा उड्डाणपूल नवीन आहे. त्यामुळे सध्या वाहनांची संख्या जास्त नाही. परंतु, या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून उपायुक्तांच्या मार्गदर्शनात तोडगा काढण्यात येईल. -माधुरी बाविस्कर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा