नागपूर : व्याघ्र संवर्धनातील स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यात ब्रह्मपुरी येथील चार वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा निर्णय राज्याच्या वनखात्याने घेतला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून मे महिन्याच्या अखेरीस यातील दोन वाघिणींना या व्याघ्रप्रकल्पात सोडण्याचे संकेत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

गेल्या काही वर्षांत राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष प्रचंड वाढला आहे. २०२१ मध्ये या संघर्षांत ८४ माणसे मारली गेली. त्यानंतर राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वाघांच्या संवर्धन स्थानांतरणाला हिरवी झेंडी मिळाली. त्यासाठी जागांची शोधमोहीम राबवण्यात आली. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या व्याघ्रप्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या समांतर नाही. त्यामुळे येथे चार वाघीण सोडून ही संख्या समांतर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. राज्यात सर्वाधिक मानव-वन्यजीव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात आहे.

वाघांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने हा संघर्ष उद्भवला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात सोडण्याचा निर्णय झालेल्या वाघिणी दीड ते दोन वर्षांच्या असून गेल्या सहा महिन्यांपासून देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब व त्यांची चमू त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. या वाघिणींना काही दिवस खुल्या पिंजऱ्यात ठेवून मग रेडिओ कॉलर लावून नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात सोडले जाईल. बिलाल हबीब हा संपूर्ण प्रकल्प हाताळत असून स्वयंसेवी संस्थांचीही यासाठी मदत घेतली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात २०० वाघ

दर चार वर्षांनी केल्या जाणाऱ्या ऑल इंडिया टायगर इस्टिमेट २०१८ च्या आकडेवारीनुसार, राज्यात ३१२ वाघ तर राज्याने स्वतंत्रपणे केलेल्या चौथ्या टप्प्यातील वार्षिक अंदाजानुसार, विदर्भात ३५२ वाघ आणि ६३५ बिबट आहेत. त्यातील सुमारे २०० वाघ एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. मानव-वन्यजीव संघर्षांत राज्यात २०२१ मध्ये ८४ माणसे मारली गेलीत. यातील ४४ माणसे एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्यातील असून १६ गडचिरोली जिल्ह्यातील आहेत.

बिलाल हबीब व वनखात्यातील अधिकाऱ्यांमध्ये एप्रिल महिन्यात यासंदर्भात एक बैठक झाली. वनविभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ पशुवैद्यकांसह दोन वाघिणींना पकडण्याची प्रक्रिया सुरू करतील. त्यांना रेडिओ कॉलर लावून नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात सोडल्यानंतर वनविभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेची चमू त्यांच्या हालचालींवर नजर ठेवेल. या वाघिणी तेथे स्थिरावल्यनंतर इतर दोन वाघिणींना याच पद्धतीने सोडण्यात येईल.

– सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव).