बुलढाणा: राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर भोलजी नजीक भरधाव खाजगी बसने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. आज बुधवारी ( दि १५) उत्तररात्री मुंबई- नागपूर महा मार्गावरील नांदुरा तालुक्यातील वडनेर नजीकच्या पुलाजवळ ही दुर्घटना घडली.
जळगाव, धुळे कडे जाणाऱ्या (एआर ०१-७७४१ क्रमांकाच्या) महेंद्र खासगी बसने (एम एच २८ बीएस ७८२१ क्रमांकाच्या) दुचाकीला भर वेगात धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी वरील तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी ओम साई फाउंडेशन व नांदुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने तिघा दुचाकीस्वारांना नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. घटनास्थळी नांदुरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले, जळगाव जामोद ठाण्याचे उपनिरीक्षक झांबरे, पोलिस कर्मचारी संजय निंबोलकर, विक्रम राजपूत, खंडारे, अनिल गोराणी, वेरुळकर, यासह विलास निबोळकर, कृष्णा नालट, अश्विन फेरण, राजु बगाडे आदींनी धाव घेतली . एक मृत मुंबई तर दोघे जळगाव खानदेश जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.