यवतमाळ : गुप्तधन काढण्यासाठी घरात खोदकाम करणाऱ्या पाच जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तालुक्यातील साकुर (हेटी) येथे हा प्रकार उघडकीस आला. ऐन गुप्तधन शोधतांना पोलिसांनी छापा टाकल्याने आरोपींच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या गेले. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी यवतमाळ शहरात गुप्तधनासाठी नरबळीचा होणारा प्रयत्नही पोलिसांनी उधळला होता.
आकाश उकंडराव कोटनाके (३०) रा.साकुर (हेटी) याच्या घरी एका खोलीत मांत्रिकाच्या माध्यमातून पूजा करून गुप्तधन शोधण्यासाठी खड्डा खोदला जात होता. चार फुटापर्यंत खोदकाम झाले असतानाच पोलिसांनी तेथे छापा टाकला.
पूजेचे साहित्य जागेवर सोडून सैरभैर पळत सुटलेल्या आकाश कोटनाकेसह सोनू ऊर्फ कुणाल सुरेश खेकारे (३८) रा.सारखणी ता.किनवट, ह.मु.कराडी पुणे, वृषभ मनोहर तोडसकर (२४) रा. तिवसाळा रा. घाटंजी, प्रदीप रामकृष्ण इळपाते (५०) रा. मेहा ता. कारंजा,बबलू ऊर्फ निश्चय विश्वेश्वर येरेकर (२६) रा. देऊरवाडी ता. आर्णी यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम तीन, महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रतिबंध करण्याबाबत तसेच समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ सह कलम ३ (५) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या आहे. साकुर हेटी येथील कोटनाके याच्या घरातील मागच्या खोलीत आरोपींनी मोठा खड्डा खोदला होता. पाचव्या फुटावर असलेले सोन्याचे घबाड काढत असताना पोलिसांनी हा डाव अर्ध्यावरती मोडून काढला. खडयाच्या शेजारी लिंबु, ताट, नारळ ओटीचे सामान असे पुजेचे साहित्य आढळले.
या प्रकरणातील काही आरोपी मोठ्या वाहनाने गावालगत पहारा देत असल्याची माहिती आहे. पोलिसांची धाड पडल्याचे कळताच या वाहनातील आरोपींनी तेथून पळ काढला. ही कारवाई ठाणेदार सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनात प्रवीण मानकर, संजय राठोड, रमेश कोंदरे,रणजित जाधव, गजानन खांदवे, सचिन पातकमवार, पंकज नेहारे, तुषाल जाधव, रूपेश नेव्हारे यांनी केली.
गुप्तधनाचा हव्यास
झटपट श्रीमंत होण्यासाठी गुप्तधनाचा हव्यास बाळगणाऱ्या मंडळीकडून जिल्हाभरात अघोरी प्रकार केले जाते. हा लोभ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. पायाळू, मुंजा, मांत्रिक, कासव यासारख्या गोष्टींची जुळवाजुळव या मंडळींकडून केली जाते. काही ठिकाणी खात्रीने गुप्तधन असल्याचा विश्वास या मंडळींना असतो. त्यासाठी काही प्रकरणात नरबळी देण्याचेही प्रकार घडतात याची प्रचीती मांत्रिक भोंदू पालवे प्रकरणातून आली आहे. त्यामुळे अशा अघोरी टोळीच्या कारवायांवर लक्ष देण्याची गरज आहे.