नागपूर : आजतागायत शेकडो पक्षी उपचारासाठी आले आणि परततील की नाही असे वाटत असताना त्यांनी आकाशात भरारी देखील घेतली. कधी पंख तुटलेले, तर कधी मान कापलेली. त्यांची जगण्याची उर्जा संपली असली तरीही पशुवैद्यकांनी त्यांची उर्जा दिली. जवळजवळ सगळेच पक्षी आता अवकाशी भरारी घेत आहेत. या घारीची कथा मात्र काही वेगळीच आहे.
नागपूरच्या कामठी परिसरातून सुजाण नागरिक कमलेश कांबळे यांनी प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारितील सेमिनरी हिल्सवरील ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्राच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला व जखमी घारीची माहिती दिली. नंतर ट्रांझिटच्या रेस्क्यू पथकातील लोकांनी गंभीर जखमी व लुस्त अवस्थेतील काळ्या घारीला उपचारासाठी १७ सप्टेंबरला ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्रात आणले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचे प्राथमिक निरीक्षण केले. तेव्हा ती अतिशय लुस्त होती. अन्ननलिका पूर्णपणे फाटलेली होती, त्यामुळे काहीही खाल्लेले अथवा पिलेले पाणी सुद्धा फाटलेल्या भागातून निघून जात होते. जेव्हा केव्हा जखमी झाली असेल तेव्हापासून तिच्या पोटात काहीही जात नव्हते. त्यामुळे ती बऱ्याच प्रमाणात अशक्त झाली होती.
तिला लगेच ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम अन्ननलिका शिवून मग गळ्याला टाके घातले. काही दिवस तिला हातांनी खाऊ घातले. जखम थोडी बरी झाल्यावर ती स्वतः खायला लागली. तिची जखम बरी झाल्याची व संपूर्ण वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून तिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी निसर्ग मुक्त करण्याचे प्रमाणपत्र दिले. नंतर तिला निसर्गमुक्त करण्यात आले. नागरिकांच्या तत्परतेने व लगेच मिळालेल्या उपचाराने आज त्या घारीचा जीव वाचला.
नाहीतर काही दिवसातच अन्न पाणी न मिळाल्याने त्या बिचाऱ्या घारीचा जीव नक्कीच गेला असता. रुग्ण कुठलाही असो वाघ असो किंवा पक्षी लवकर व योग्य प्रामाणिकपणे उपचार करणे हा ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर च्या लोकांचा धर्म व आद्य कर्तव्य आहे. डॉ विनिता व्यास, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, यश काळे, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात तसेच कुंदन हाते, समन्व्यक ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर यांच्या नेतृत्वात डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. प्रियल चौरागडे, पशुपर्यवेशक सिद्धांत मोरे, पंकज थोरात, प्रवीण मानकर यांच्या अथक परिश्रमातून ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमधून बऱ्याच धोकाग्रस्त वन्यजीवांना नवसंजीवनी मिळत आहे.