लोकसत्ता टीम
नागपूर : आदिवासी समाजात जिथे कधीकाळी दाराच्या बाहेर पाऊल टाकणेही कठीण होते, तिथे आता कुठे मुली शिकायला लागल्या आहेत. शहरात येऊन वसलेला आदिवासी समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आता कुठे रुळला आहे. मात्र, खेड्यापाड्यातील परिस्थिती अजूनही फारशी बदललेली नाही.
शहरापासून कोसो दूर असणाऱ्या याच समाजातील एका मुलीने थेट आकाशात झेप घेतली आहे. आदिवासी समाजातील इतर मुलींसाठी तीने आकाशाची दारे खुली केली आहे. आकाशाला गवसणी घालण्याचे तिचे स्वप्न. त्यासाठी परिश्रम घेण्याचीही तयारी आणि त्यादृष्टीने तिची वाटचाल सुरू झाली. खरं तर हे ध्येय गाठणे अवघड होते, पण प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल न करता, आहे त्या परिस्थितीवर मात करणाऱ्यातली एक म्हणजे सुषमा शिवलाल कोरेटी. हवाई सुंदरी होण्याचे ध्येय ठरवून आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न अर्जूनी मोरगाव तालुक्यातील भसबोळन येथील सुषमाने पाहीले. एवढेच नाही तर हे स्वप्न तिने पूर्ण केले असून एअर इंडियात ती एअर होस्टेस म्हणून रुजू झाली आहे. तिच्या या स्वप्नपुर्तीमुळे आता इतरही आदिवासी तरुणींमधील विश्वास जागृत झाला आहे. तिच्या यशाने आदिवासी बहुल दुर्गम भागातील इतर विद्यार्थिनींनासुद्धा प्रेरणा मिळाली आहे. सुषमाच्या या यशाने केवळ भसबोळन नव्हे तर संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुकावासीयांची मान उंचावली आहे.
आणखी वाचा-११ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यवतमाळात; वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे उद्घाटन होणार?
सुषमाचे वडील शेतकरी आणि घरची आर्थिक परिस्थितीसुद्धा जेमतेमच, पण या सर्व गोष्टींचे भांडवल न करता ती आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत राहिली. सुषमाचे इयत्ता पहिले ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम डोंगराळ जेमतेम दहा ते पंधरा कुटुंब संख्या असलेल्या भसबोळन येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर, पुढील शिक्षण जवळच्या झाशीनगर येथे झाले. त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण आदिवासी विकास विद्यालय झाशीनगर येथे पूर्ण करून पुढे अकरावी व बारावीचे शिक्षण सोसायटी सायन्स कॉलेज साकोली येथे घेतले.
तिथे सुषमाने प्रावीण्य प्राप्त केले आणि पुढील शिक्षण नागपूर येथे घेतले. यानंतर एअर होस्टेसचे प्रशिक्षण पूर्ण केले. नागपूर व मुंबई येथे एअर होस्टेसचे प्रशिक्षण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केले. यानंतर सुषमा एअर इंडियात एअर होस्टेस म्हणून रुजू झाली आहे.