गडचिरोली : सलग दोन दिवस झालेल्या अपघातामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असतानाच रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या दोन विविध घटनांमध्ये दोन भावांना जीव गमवावा लागल्याने मृतांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. यातील पहिल्या घटनेत महावितरण कंपनीत सहायक अभियंता पदावर कार्यरत दलसू कटिया नरोटे (वय ३७) यांचा कारमपल्ली गावाजवळच्या नाल्यात बुडून मृत्यू झाला. तर सिरोंचाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने मोटारसायकलवरील ८ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर वडील आणि आई जखमी झाले. दोघेही मृत रक्षाबंधनासाठी गावाकडे आले होते.
एटापल्ली तालुक्यातील कारमपल्ली येथील मूळ रहिवासी व नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे दलसू नरोटे हे सुट्या घेऊन जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधनासाठी पत्नी व दोन मुलांना घेऊन ७ ऑगस्टला मुलचेरा तालुक्यातील पुल्लीगुडम या आपल्या सासुरवाडीला गेले. दुसऱ्या दिवशी ते कारमपल्लीला गेले. तेथे शेतात धान रोवणी सुरु असल्याने ते शेतावर गेले. काही वेळाने ते जवळच्या नाल्यावर गेले. मात्र, मिरगी आल्याने ते नाल्यात पडले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी नाल्याकडे जाऊन बघितले असता ते पाण्यात पडलेले दिसले. त्यांना एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रक्षाबंधनासाठी जात असताना अपघात
असरअली येथील संतोष कोकू हे पत्नी व मुलाला घेऊन मोटारसायकलने सिरोंचा येथे रक्षाबंधनासाठी जात होते. अंकिसा येथे पोहचताच गावात रामकृष्ण चिरला यांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. परंतु रस्ता अरुंद असल्याने संतोष कोकू यांचे नियंत्रण सुटून मोटारसायकल ट्रॉलीला धडकली. यात शौर्यचा जागीच मृत्यू झाला. संतोष कोकू यांचा डावा हात आणि पाय मोडला, तर सौंदर्या कोकू किरकोळ जखमी झाल्या. संतोष कोकू यांच्यावर सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना तेलंगणातील वारंगळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या दोन्ही घटनेमुळे एटापल्ली, असरअली व सिरोंचात शोककळा पसरली आहे.