बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज झालेल्या भीषण आणि तितक्याच विचित्र अपघातात दोघे भाविक ठार तर तेराजण जखमी झाले. यातील तिघा महिलांची प्रकृती गंभीर असून इतर भाविक किरकोळ जखमी आहेत. तेरा जखमीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मृत आणि जखमी यवतमाळ जिल्ह्यातील आसेगाव देवी ( तालुका बाभुळगाव ) येथील रहिवासी असल्याचे वृत्त आहे. ते शिर्डी येथे दर्शनाकरिता जात होते.

आज शनिवारी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्हा हद्धीतील माळ सावरगाव (तालुका सिंदखेड राजा) नजीकच्या मुंबई कॅरिडोर वर हा भीषण अपघात झाला. आज शनिवारी सकाळी आसेगाव देवी (तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ) येथून भाविक क्रूजर (क्रमांक एम एच -२५-आर -३५७९) गाडीने शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी निघाले. बाबांचे दर्शन होणार या जाणीवने आंनदी असलेल्या या भाविकांना काही तासानंतर आपल्या समोर नशीब वा नियतीने काय मांडून ठेवले आहे? याची कल्पनाही नव्हती. भाविकांचे वाहन बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाले.

असा झाला अपघात

सिंदखेडराजा जवळील माळसावरगाव येथे मुंबई कॅरिडोर चायनैज क्रमांक ३४४.७ जवळ क्रुझर च्या डाव्या बाजूचे पाठीमागील टायर फुटल्याने सदर क्रुझर अनियंत्रित झाली. यामुळे हे वाहन भरवेगात उलटले. नेमके त्याच वेळी पाठीमागून क्रेटा कार (क्रमांक एम एच -२९-सीबी -९६३० ) भरवेगात येत होती. क्रूझर अचानक उलटल्याने चालक हर्षल देवानंद भाग्यवंत (वय २८ वर्ष राहणार यवतमाळ) यांना अंदाज न आल्याने क्रुझरला क्रेटा कार पाठीमागून भरवेगात धडकली.

यामुळे क्रूझर मधील विद्याबाई साबळे वय ५५ वर्ष आणि मोतीराम बोरकर वय साठ वर्ष (दोन्ही आसेगाव देवी तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच भावना रमेश राऊत वय ३०, प्रतिभा अरुण वाघोडे वय ४५ वर्ष ,मीरा गोटफोडे वय ६५ वर्ष ह्या तिघीजणी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ महामार्ग १०८ ॲम्बुलन्स चे डॉक्टर यासीन शहा, वैभव बोराडे चालक दिगंबर शिंदे दळवी यांनी तात्काळ जालनायेथे उपचार साठी दाखल केले. याशिवाय क्रूझर चालक संतोष साखरकर वय २८, कमला जाधव वय ५५,वर्ष सुशीला जाणार वय ५२ वर्ष, मिरा राऊत वय साठ वर्ष, छायाबाई चव्हाण वय ६५ वर्ष, प्रमिला घाटोळ वय ६०, वर्ष, भक्ती राऊत वय ५ वर्ष, रमेश राऊत वय ४० वर्ष, बेबीबाई येलोत वय ६० वर्ष, मोतीराम बोरकर वय ६५ वर्ष (सर्व राहणार आसेगाव देवी तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ) हे किरकोळ जखमी झाले. सुदैवाने क्रेटा कार मधील कोणालाही कोणत्या प्रकारची इजा झाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताची माहिती प्राप्त होताच महामार्ग पोलीस चे ‘पीएसआय’ गजानन उज्जैनकर, हवालदार मुकेश जाधव व सिंदखेड राजा पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप डोंगरे ,विष्णू नागरे यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन किरकोळ जखमीना औषध उपचार कामी रवाना केले.’क्यूआरव्ही टीम’ सिंदखेड राजा चे पवन काळे , खंडू चव्हाण , अभिषेक कांडेकर व महाराष्ट्र सुरक्षा बल चे मच्छिंद्र राठोड ,अविनाश राठोड , अजय पाटील यांनी सर्व मृतक व जखमी यांना क्रुझर मधून बाहेर काढले.अपघातग्रस्त वाहने महामार्गाच्या बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत झाली.