लोकसत्ता टीम

चंद्रपूर : राजुरा येथे शिवज्योतसिंह देवल (२८) यांच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करणाऱ्या लल्ली शेरगील व शगीर उर्फ मोणू कादीर शेख या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास अटक केली. तर बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणात देखील जबलपूर येथून दोन गँगस्टरला अटक करण्यात आली आहे.

गेल्या वीस दिवसात या जिल्ह्यात गोळीबार व पेट्रोल बॉम्ब हल्ल्याच्या तीन घटना घडल्याने जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशातच जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपअधीक्षक रीना जनबंधु यांनी राजुरा गोळीबार घटना सायंकाळी ७.३० वाजता घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, राजुरा पोलिस ठाणे व राजुरा उपविभागीय अधिकारी अशी पथके गठित केली व तपासाची चक्रे वेगाने फिरली.

आणखी वाचा-चंद्रपूर : दबा धरून बसलेल्या वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला

राजुरा पंचायत समिती समोरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम समोर शिवज्योत सिंह देवल याच्यावर गोळीबार करून हत्या केली. या हत्येच्या पूर्वी लल्ली शेरगील याच्यावर सोमनाथ पुरा येथे हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावून शोध घेतला व गोळीबार करून फरार झालेले लल्ली शेरगील व शगिर उर्फ मोनु कादीर शेख हे दोघे जिल्ह्यातून फरार होण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पोलिसांनी अटक केली. चार तासात या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा गोळीबार नेमका का केला याचा शोध पोलीस घेत आहे.

तर बल्लारपूर येथे ७ जुलै रोजी मालू यांच्या कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला होता. हल्ला करून आरोपी पळून गेले होते. या घटनेबाबत पोलीस स्टेशन बल्लारपुर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु हे तात्काळ घटनास्थळी पोहचून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, बल्लारशा पोलीस स्टेशन यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जबलपूर राज्य मध्यप्रदेश येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा- राजुरात गोळीबार, एक ठार; चंद्रपूर जिल्ह्यात महिनाभरात तिसऱ्यांदा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर आरोपी हे जबलपूर येथील कुख्यात गँगस्टर असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच उर्वरित दोन आरोपींना स्थानिक पोलीस स्टेशन बल्लारपूर यांच्या मदतीने अटक करण्यात आली असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करित आहे.