नागपूर : पिस्तूल घेऊन कुणाचा तरी खून करण्याच्या तयारीत असलेल्या युवकासह पिस्तूल विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी पिस्तूल आणि मॅग्झिन जप्त केली. परविंदरसिंह प्रीतमसिंह घट्टरोडे (२३, बाबा दीपसिंगनगर) आणि मॉरिस एरिस्वामी फ्रांसीस (मोहननगर, खलासी लाईन) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परविंदरसिंह घट्टरोडे हा कुख्यात गुंड असून त्याचे नुकताच एका टोळीशी वाद झाला होता. हद्दीच्या वादातून त्या टोळीतील एकाने परविंदरसिंहला धमकी दिली होती. त्यामुळे त्या युवकाचा काटा काढण्याच्या कट त्याने रचला. त्याने मॉरिस फ्रॉन्सीस याच्याकडून ५० हजार रुपयांत विदेशी बनावटीची पिस्तूल विकत घेतली. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता तो पिस्तूल घेऊन प्रतिस्पर्ध्याच्या टोळीतील सदस्याला धडा शिकविण्यासाठी जात होता. ही माहिती गुन्हे शाखेच्या पथक दोनचे प्रमुख पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांना यांना मिळाली. त्यांनी लगेच सहायक निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकाला सापळा रचण्यास सांगितले.

हेही वाचा – विदेशात संशोधन कार्यासाठी मिळणार शिष्यवृत्ती, ‘‘या” योजनेस मुदतवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी कपिलनगरात सापळा रचला. परविंदरसिंह तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पाठीमागे लपविलेली पिस्तूल आणि मॅग्झिन पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख राहुल शिरे, गणेश पवार, गजानन कुबडे, प्रवीण शेळके, महेंद्र सेडमाके, दिनेश डवरे, आशिष वानखडे, सुनील कुवर यांनी केली.