नागपूर : ओदिशा ते गडचिरोली असा प्रवास करणाऱ्या रानटी हत्तीच्या कळपातील दोन हत्तींनी पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. शुक्रवारी रात्री ते सावली वनक्षेत्रात दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभाग त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गावकऱ्यांनी हत्तींना त्रास देऊ नये, ओरडू नये किंवा दिसल्यास त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करू नये. ते दिसल्यास वनविभागाला कळवावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.
ओदिशावरुन छत्तीसगार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेले हत्ती गेल्या दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातच तळ ठोकून आहेत. मे महिन्याच्या अखेरीस त्यातील दोन रानटी हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही परिसरात दाखल झाले होते. त्यावेळी या दोन्ही हत्तींनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात ठाण मांडल्याने व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाची चिंता देखील वाढली होती. ऐन पर्यटनाच्या रस्त्यावर हत्ती आलेत तर काय, असा प्रश्नही व्यवस्थापनाला पडला होता.
पर्यटकांना होणारा धोका लक्षात घेता जंगल सफारी सुरू ठेवायची की नाही, असा प्रश्न व्यवस्थापनासमोर होता. कारण ताडोबात पर्यटन हंगामाची ही अखेर होती. मात्र, लवकरच या हत्तींनी तेथून काढता पाय घेतला आणि ताडोबा व्यवस्थापनासह सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. सावली पर्वतरांगातील वैनगंगा नदीजवळील गावातील शेतातून ताडोबा जंगलात घुसले आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू केला. गेल्या महिन्याभरात त्यांनी वैनगंगा ओलांडली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही हत्ती त्यांच्या नेहमीच्या मार्गाने शेतात घुसले. विहिरगाव, गेवरा खुर्द, रामनगर, सायखेडा आणि उसरपार चकमधून फिरून आल्यानंतर ते असोला मेंढा तलावाच्या मध्यभागी एका ठिकाणी स्थिरावले.
स्थानिक मच्छिमारांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर छायाचित्र घेऊन वनविभागाला माहिती दिली. शनिवारी देखील ते सावली तालुक्यातच आढळून आलेत. हत्तींना त्रास झाला तर ते आक्रमक होऊ शकतात आणि मानवांसाठी धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे कुणीही रात्री बाहेर जाऊ नये, हत्तींजवळ जाऊ नये, छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्यांना हाकलून लावण्यासाठी त्यांच्यावर ओरडू नये. वनकर्मचारी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत, असे वनविभागाने कळवले आहे. हे हत्ती परत गेल्यानंतर वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, ते परत आल्याने पुन्हा एकदा वनखात्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.