गोंदिया: आमगाव देवरी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीस्वाराने भीषण धडक दिली. ही धडक भयावह असल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आमगाव-देवरी या राष्ट्रीय मार्गावरील पोवारीटोला नाल्याजवळ घडली. सुनील लखन ब्राह्मणकर असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव असून, तो भालीटोला (अंजोरा) येथील रहिवासी आहे.

आमगाव-देवरी राष्ट्रीय महामार्गावर बाह्मणी रेल्वे गेट ते पोवारीटोला या मार्गावरील नाल्याजवळ सीजी ०८ /एई- ८१११ क्रमांकाचा ट्रक उभा होता. ट्रकचालक ट्रक उभा करून निघून गेला. पण, त्याने ट्रकचे लाइट किंवा सूचना फलक लावले नव्हते. घटनास्थळी अंधार असल्याने मागेहून येणाऱ्या दुचाकीस्वाराने उभ्या ट्रकला धडक दिली. ही धडक भयावह असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आमगाव पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आमगाव पोलिस करीत आहेत.

अपघातात दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू

निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले दरम्यान त्याने समोरील दुभाजकाला जबर धडक दिली. या घडलेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना आमगाव-गोंदिया मार्गावरील विवेक मंदिर शाळेजवळ मंगळवारी  रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडली. नमन हेमंत रहांगडाले असे मृताचे नाव असून, तो कोसमटोला (आसोली) येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच ३५ / बीए ५३९३ क्रमांकाच्या दुचाकीने नमन गोंदिया येथून आमगावकडे जात होता. रस्त्यात त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुभाजकाला भीषण धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पुढील तपास आमगाव पोलिस करीत आहेत.

शेतात फवारणी नंतर विषबाधेने शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू झाला. ही घटना सालेकसा तालुक्यातील मक्काटोला येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सालेकसा तालुक्यातील मक्काटोला येथील रविंद्र चैतराम बडोले (५०) हा शेतकरी मंगळवारी आपल्या शेतातील धान पिकावर किटकनाशकांची फवारणी करण्याकरीता गेला होता. मात्र, तो घरी परतला नाही. त्यांचा मोठा भाऊ पोलिस पाटील जितेंद्र चैतराम बडोले (५४) हे शेतात गेले असता रवींद्र चैतराम बडोले हा शेतात पडून होता. दरम्यान, त्याने उलटी केली होती. त्याला फवारणीदरम्यान विषबाधा झाली असावी, असा संशय आल्याने तातडीने त्याला सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सदर शेतकऱ्याचा शेतात फवारणी केल्या नंतर विषबाधेने मृत्यू झाल्याची नोंद सालेकसा पोलिसांनी केली आहे.