वर्धा: दोन दिवसापासून जिल्ह्यात नवरात्र उत्सवातील देवीच्या विसर्जनाची धामधूम सूरू आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक देवी उत्सव साजरा केल्या जात असतो. पण यावेळी विसर्जन सोहळ्यास गालबोट लागले. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावातील दोन युवकांचा वणा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मात्र एकाला वेळेत वाचविण्यात यश आले आहे. हर्षल नथुजी चाफले, वय २४ तर विशाल मनोहर पोहाणे, वय २५ असे मृतकाचे नाव आहे.
हे दोघेही दारोडा येथील रहिवासी असून देवी विसर्जनासाठी नदीकाठी गेले होते. मात्र विसर्जनाच्या वेळी पाण्यात तोल जाऊन दोघेजण वाहून गेले. आज सकाळी शोध मोहीम सूरू झाली. तेव्हा घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर टेम्बा शिवारात दोन्ही युवकांचे मृतदेह हाती लागले.सोबत असलेला भोजराज मेश्राम याला मात्र ग्रामस्थांनी वाचवले. गुरुवारी रात्रभर शोधाशोध सूरू होती.
दसऱ्याच्या दिवशी दोन तरुणांचे प्राण गेल्याने दारोडा गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गावात दोन अंत्यसंस्कार असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसऱ्या एका घटनेत एका माथेफेरू युवकाने देवीच्या मंडपात गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला. -वर्ध्यात सावंगी रोडवरील दुर्गा पुजा उत्सव मंडपात काल रात्री हा प्रकार घडला. आज त्याची चांगलीच चर्चा झाली. सकाळी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बजाज चौकात ठिय्या देत आरोपीस अटक करीत त्याला माफी मागायला लावण्याची मागणी केली. हे झाल्याशिवाय विसर्जन मिरवणूक पुढे जाणारच नाही, असा पवित्रा घेतला. मंडपात महिला गरबा खेळत असतांना या युवकाने धिंगाणा घातला. शिवीगाळ केली. तसेच मूर्तिची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
शहर पोलिसांनी स्पष्ट केले की रात्रीच सदर आरोपीला अटक झाली असून गुन्हे पण दाखल करण्यात आले आहे. मात्र संतप्त जमाव ऐकायला तयार नसल्याने शेवटी शहर पोलिसांनी कठोर कारवाई झाल्याचे नमूद केले. दुर्गा मूर्ती विसर्जित न करता मूर्ती पोलीस स्टेशनसमोर आणल्या गेली वाढता तणाव पाहून पोलिसांची एसआरपीसह मोठी कुमक दाखल झाली होती.
पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अफवावर विश्वास नं ठेवता शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. गुन्हे दाखल झाले नाही असा लोकांचा गैरसमज झाला होता. पण कठोर कारवाई करण्यात आली आहे.