बुलढाणा : भाजप आणि मिंधे सरकारच्या राजवटीत गद्दारांना ५० खोक्यांचा हमीभाव मिळाला. मात्र, चोहीबाजूने संकटाच्या चक्रव्युहात अडकलेल्या शेतकऱ्यांना भाव नाही. त्यांना केंद्रातील मोदी तर राज्यातील मिंधे सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यामुळे लोकसभा निवडणुकीत हुकूमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या मोदी सरकारला पायउतार करून गद्दारांना पराभूत करून जमिनीत गाडा, असे आवाहनही त्यांनी केले.

आजपासून बुलढाणा येथे दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंची पहिली सभा आज, गुरुवारी चिखली येथे पार पडली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी बंडखोर व भाजपवर टीकेचा आसूड उगारला. राजा टॉवर येथे रणरणत्या उन्हात पार पडलेल्या या सभेला सेना नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह शिवसैनिक बहुसंख्येने हजर होते. यावेळी ठाकरे यांनी गद्दारांना लक्ष्य केले.

हेही वाचा – नक्षलवाद्यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, शत्रूसारखी वागणूक देणाऱ्या सरकारला धडा शिकवा; पत्रकाद्वारे आवाहन

शिवसैनिक व जनतेच्या ताकदीने मोठी झालेले गद्दारी करून तिकडे गेले. त्यांना ५० खोके लखलाभ होवो, पण त्यांना आता जनतेची साथ, आशीर्वाद लाभणार नाही हे नक्की आहे. त्यांनी आमचा धनुष्य चोरला, पक्ष चोरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, काहीही केले तरी त्यांच्या कपाळावरील गद्दारीचा काळाकुट्ट डाग पुसला जाणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता जनार्दन त्यांना त्यांची जागा दाखविणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. माझा नरेंद्र मोदींना वैयक्तिक विरोध नाही, तर त्यांच्या हुकूमशाहीला अन एकाधिकारशाहीला विरोध आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही या हुकूमशाही विरुद्ध आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही मतदारांची देखील कसोटी पाहणारी ठरली आहे. हुकूमशाही हवी की लोकशाही? याचा सारासार विचार करून मतदान करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

उत्तरेकडील हजारो शेतकरी पुन्हा दिल्लीच्या सीमेवर आले आहे. निडरपणे आंदोलन करीत आहे. गोळीबार, अश्रूधुर असे केंद्राचे अन्याय सहन करीत ते आंदोलन व आपल्या मागण्यांवर ठाम आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी अन्याय सहन करत शांत आहे. बुलढाण्यातही असेच चित्र आहे. जिजाऊंच्या बुलढाणा जिल्ह्याचा अन शिवरायांच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान गेला तरी कुठे? असा उद्विग्न सवाल ठाकरेंनी यावेळी केला.

काँगेससोबत का गेलो?

यांचे उत्तर देताना त्यांनी भाजपने अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या वचनाचा भंग केल्यामुळे हे केले. त्यांनी शब्द तोडल्याने हे करावे लागले. पंतप्रधान वाजपेयी मोदींना बाहेर फेकायला निघाले तेव्हा फक्त बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना वाचविले, त्यांचे समर्थन केले, हे सत्यही ‘ते’ विसरले अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – नागपूर : ऑटोचालकाशी सलगी तरुणीला भोवली अन् नको ते घडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंत्रणा घरघडी अन ‘धोंड्या’ची कारवाई

आज सगळ्या यंत्रणांचा घरगडी प्रमाणे वापर सुरू आहे. आयोगाने आमच्या पक्षाचे नाव बदलले. यामुळे आम्हीही त्यांचे नाव बदलून ‘धोंड्या’ असे ठेवलंय. धोंड्याच्या कारवाईचा निवडणुकीत आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही, कारण जनता आमच्या पाठीशी असल्याचे ठाकरे म्हणाले.