सरसंघचालक-उद्धव ठाकरे भेट; रिझव्‍‌र्ह बँकेवरील आजचा मोर्चा रद्द

नोटाबंदीमुळे सामान्यांना होत असलेल्या त्रासासाठी मोदी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेच्या वतीने आज, सोमवारी मुंबईत रिझव्‍‌र्ह बँकेवर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेला सबुरीचा सल्ला, तसेच भारतीय जनता पक्षाकडून आलेला दबाव यामुळे सेनेने माघार घेत प्रस्तावित मोर्चा रद्द केला आहे. आता केवळ रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांना त्याबाबत निवेदन दिले जाईल.

नोटाबंदीमुळे सामान्यांना होत असलेल्या त्रासाविरोधात शिवसेनेच्या वतीने आज, सोमवारी सकाळी ११ वाजता रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुंबईतील मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. राज्यपाल सी विद्यासागर राव यांची दुपारी १२ वाजता भेट घेवून त्यांना निवेदन दिले जाणार होते. शिवसेना खासदार व नेत्यांना आणि शेकडो कार्यकर्त्यांना मोर्चासाठी तयारी करण्याचे निरोपही देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कन्येच्या विवाहानिमित्ताने उद्धव ठाकरे रविवारी नागपूरला आले होते. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. नोटाबंदीसह काही राजकीय विषयांवर त्यांची सविस्तर चर्चा झाली. सरसंघचालक भागवत यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ५० दिवसांचा कालावधी केंद्र सरकारला दिला पाहिजे, अशी भूमिका घेत ठाकरे यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजपबरोबर अनेक वर्षे असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही त्यांचे कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना सत्तेत सहभागी असताना मोदी यांच्या निर्णयाविरोधात रिझव्‍‌र्ह बँकेवर मोर्चा काढला गेल्यास त्यातून चुकीचा संदेश जनतेमध्ये जाईल. त्यामुळे शिवसेनेने आंदोलन करू नये, अशी सूचना भागवत यांनी केल्याचे समजते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यास उपयोग होणार नाही, असे लक्षात आल्याने सरसंघचालकांच्या मध्यस्थीने हे साध्य करण्यात आले.

त्यांच्या सूचनेमुळे ठाकरे यांनी माघार घेतली. शिवसेनेचे शिष्टमंडळ केवळ रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्‍‌र्हनरांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहे. पोलिसांच्या विनंतीवरून आंदोलन रद्द केल्याचे शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच, राज्यपालांची भेटही शिवसेना शिष्टमंडळाने रद्द केली असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.

सरसंघचालकांच्या सबुरीच्या सल्ल्यामुळे शिवसेना आता नोटाबंदीबाबत मवाळ झाली आहे. विधिमंडळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरात सूर मिसळून शिवसेना आमदारही सामील होण्याची भीती मुख्यमंत्री फडणवीस यांना होती. पण आता शिवसेनेच्या विरोधाची धार तूर्तास तरी जाणवणार नाही, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.