लोकसत्ता टीम
बुलढाणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली व सेवा, सुशासन व गरिबांचे कल्याण त्रिसूत्रीद्वारे देशाने चौफेर प्रगती व विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे. काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत केवळ ९ वर्षांत ही प्रगती झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी केला आहे.
बुलढाण्यातील गर्दे वाचनालय सभागृहात शुक्रवारी रात्री उशिरा संपलेल्या जन संवाद सभेत यादव यांनी मोदी राजवटीत झालेल्या आढावा सादर केला. आर्थिक सह कृषी क्षेत्रात भारताने मोठा पल्ला गाठला. सामान्यासाठी साडेतीन घरकुले बांधण्यात आली असून ९ हजार ३०० जेनेरिक मेडिकल दुकाने कार्यान्वित झाली. पर्यावरणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे आज ४० टक्के भारतीय’ डिजिटल पेमेंट’ द्वारे व्यवहार करीत असल्याचे यादव यांनी सांगितले.
हेही वाचा… बुलढाणा: रागाच्या भरात अल्पवयीन मुलाकडून मद्यपी वडिलांचा खून
करोडो लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात हे सरकार यशस्वी ठरले आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीच्या तुलनेत मोदी सरकारने केवळ ९ वर्षांत कैक पटीने प्रगती केल्याचा दावा त्यांनी बोलून दाखविला. यावेळी आमदार संजय कुटे, श्वेता महाले, माजी आमदार चैनसुख संचेती, लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी तर संचालन विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे यांनी केले. यापूर्वी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘टायगर प्रोजेक्ट’सह अन्य काही प्रकल्प यशस्वीपणे राबविले. चित्त्यांचे पुनर्वसन हा प्रकल्पही आगामी पाच वर्षाच यशस्वी होईल, असा आशावाद केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी येथे बोलून दाखविला.
जनसंवाद सभेपुर्वी आयोजित पत्र परिषदेत त्यांनी देशाच्या प्रगतीवर भाष्य केले. नऊ वर्षात देश अनेक क्षेत्रात आत्मनिर्भर झाला असून, एकट्या संरक्षण क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांचे उत्पादन भारत करत आहे. कोरोना काळात २०० कोटी नागरिकांचे लसीकरण ही एक मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. आज इंग्लंडपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था मोठी झाली असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले. महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकार योग्य दिशेने पावले उचलत असून, विकासाचा वेग वाढला आहे. महाराष्ट्रात आज इतिहासाची मोडतोड होत असून, असामाजिक तत्त्वांना पाठबळ देण्याचे काम विरोधी पक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी भूपेंद्र यादव यांनी केला. यावेळी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यासह भाजप नेते हजर होते.