नागपूर : खवय्ये म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनेकदा रात्रीच्या सुमारास खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कुटूंबियांसोबत बिनधास्त बाहेर पडतात. ते त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी कायमच ओळखले जातात. हेच केंद्रीय मंत्री जेव्हा आजोबांच्या भूमिकेत शिरतात, तेव्हा नातवांचा हट्ट पुरवण्यासाठी ते खरेदीला बाजारपेठेत देखील जातात. त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन त्यांनी असाच एक व्हिडिओ सामाईक केला आहे. यात ते नातवंडांच्या हट्टापुढे नमलेले दिसून येत आहे.

दिवाळी हा सण गरीब, श्रीमंत सारेच आपआपल्या पद्धतीने साजरा करतात. लहानमोठ्या बाजारपेठेतून दिवाळी साजरी करण्यासाठी आपआपल्या क्षमतेनुसार लोक खरेदीदेखील करतात. या सणाची सुरुवात काल वसुबारसेपासून झाली. राजकारणी व्यक्तीमत्त्व आणि त्यातही केंद्रीय मंत्री असणारे नितीन गडकरी यांनी नातवंडांचा हट्ट पुरवण्यासाठी दिवाळीच्या खरेदीसाठी थेट बाजारपेठ गाठली.

अतिशय व्यस्त अशा वेळापत्रकातून ते कायमच सणांना आपल्या कुटुंबियांना वेळ देताना दिसून येतात. या व्हिडिओत त्यांचे नातवंडांसोबतचे अमुल्य क्षण टिपण्यात आले आहेत. बैठका, कामकाज अशा अतिव्यस्त वेळापत्रकातून त्यांनी नातवंडांसाठी वेळ काढला. विशेष म्हणजे त्यांनी नातवंडांसाठी दिवाळीला फटाक्यांची खरेदी केली. ते फटाके घरीही मागवू शकले असते, पण नातवंडांच्या इच्छेखातर त्यांनी बाजारपेठ गाठली.

नागपूरच्या बाजारपेठेत दिवाळीसाठी फटाक्यांची खरेदीसाठी नितीन गडकरी पोहोचले आणि तिथे असणार्‍या दुकानदारांची तारांबळच उडाली. काही लोक फक्त त्यांना भेटण्यासाठी आले, पण त्यांनी त्यांचा पूर्णवेळ नातवंडांना दिला. नातवंडांच्या आवडीचे फटाके गडकरी आजोकांनी घेतल्यामुळे नातवंडांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहताना दिसला.

गडकरी दरवर्षी आपल्या कामातून वेळ काढत नातवंडांसोबत फटाके खरेदीसाठी जातात, सणावाराला या बच्चेकंपनीसमवेत वेळही घालवतात आणि हे वर्षसुद्धा त्याला अपवाद ठरले नाही. ते कार्यकर्त्यांमध्ये जेवढे रमतात, तेवढेच ते कुटूंबात देखील रमतात आणि नातवंडांसाठी फटाके खरेदी करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता. त्यांचे हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आणि त्यांनी स्वत: देखील त्यांच्या सोशल अकाउंटवरुन ते क्षण सामाईक केले.

cदिवाळीत फटाक्यांची खरेदी हा कपड्यांच्या खरेदीपेक्षाही आनंदाचा क्षण असतो. त्यात अनेकांच्या आठवणी असतात. नातवंडांसोबत ही खरेदी करताना गडकरी आजोबा देखील तेवढेच रममाण झालेले या व्हिडिओत दिसून आले. यापूर्वीही त्यांचे नातवंडांसोबतचे खरेदीचे अनेक क्षण सामाईक झाले आहेत. कुटूंबियोसाबत ते अगदी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे खरेदीला जातात. त्यांच्यात केंद्रीय मंत्रीपदाचा कोणताही आव त्यावेळी नसतो.