सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ठेंगा

नागपूर : विद्यापीठ हे विद्यार्थी केंद्रित असणे अपेक्षित असले तरी दोन दिवस चाललेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा बैठकीत विद्यार्थ्यांसंबंधित कुठल्याही विषयांवर चर्चा झाली नाही. दुसऱ्या दिवशीही प्रशासनाच्या कामकाजावर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर विद्यापीठ प्रशासनाकडूनही उडवाउडवीची उत्तरे देत कुठल्याही धोरणात्मक निर्णयाशिवाय विधिसभा आटोपली.

विद्यापीठाच्या विधिसभा बैठकीत दुसऱ्या दिवशी १२ फेब्रुवारी २०२१ ला झालेल्या ऑनलाईन बैठकीच्या कार्यवृत्तावर चर्चा करण्यात आली. यावेळी त्याचा कृती अहवाल सादर करण्यात आला. मात्र, या अहवालात सदस्यांच्या प्रश्नावर कारवाई सुरू आहे, असा शेरा देण्यात आला होता. यावर सदस्यांनी नेमकी कोणती कारवाई झाली, याबाबत प्रशासनाकडे विचारणा करीत, त्या सदस्याला ती माहिती का देण्यात आलेली नाही असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, त्यावर थातूरमातूर उत्तरे देत, प्रशासनाकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यामध्ये प्रामुख्याने सदस्य डॉ. अजित जाचक, प्रा. प्रशांत डेकाटे यांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रशासनाकडून नेमकी उत्तरे येत नसल्याने सदस्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी सदस्यांना कारवाईचे पत्र का मिळत नाही, यावर डॉ. जाचक यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर यापुढे ते नियमित मिळेल हे मान्य केले. केवळ कार्यपालन कृती अहवालावरच चार तास चर्चा करण्यात आली.

प्रस्तावावर खडाजंगी

सदस्यांच्या प्रस्तावावर प्राधिकरणाद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयावर काही सदस्यांनी आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली. यामध्ये डॉ. अजित जाचक यांच्या ग्रंथपाल, उपग्रंथपाल, शारीरिक शिक्षण विभागातील अध्यापनाच्या अनुभवाच्या आधारे पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यतेचा प्रस्ताव टाकण्यात आला होता. मात्र, त्याला विद्वत परिषदेद्वारे अमान्य करण्यात आले. यावरही बाब विद्वत परिषदेने अमान्य केल्याने त्यावर डॉ.जाचक यांनी आक्षेप घेतला. मात्र, डॉ. आर.जी. भोयर यांनी त्यावर आक्षेप घेतला. याशिवाय असा आक्षेप घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. यामध्ये डॉ. बबनराव तायवाडे आणि डॉ. नितीन कोंगरे यांनी उडी घेतल्याने सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मात्र, त्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव सुधारणेसह स्वीकारण्याचे मान्य केले.