मुख्यमंत्र्यांची घोषणा; जिल्हय़ात बचत मॉल
महिला बचत गटांना त्यांच्या छोटय़ा उद्योगांसाठी बिनव्याजी (शून्य टक्के दराने) कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूरमध्ये केली. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात बचत मॉल उभारण्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
राज्य शासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर येथील क्रीडा संकुलात पूर्व विदर्भातील राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान व दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पूर्व विदर्भातील महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. मेळाव्याला १५ ते २० हजार महिला उपस्थित होत्या. सुरुवातीला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महिला बचत गटाच्या समस्या मांडल्या. कर्जपुरवठय़ात येणाऱ्या अडचणी, बँकेकडून होणारा त्रास, बाजारपेठेचा प्रश्न त्यांनी मांडले व शून्य टक्के दराने शासनाने कर्जपुरवठा करावा, अशी मागणी केली. याच मागणीचा आधार मुख्यमंत्र्यांनी घेतला. महिलांच्या सशक्तीकरणावर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले, महिलांना बळ दिले तर त्या कोणत्याही संकटावर मात करू शकतात. ही बाब लक्षात घेऊनच शासनाने महिलांच्या बचत गटांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्जावरील व्याजाचा भार शासन सहन करेल. महिलांना कर्ज दिले तर ते बुडण्याची शक्यता कमी असते. त्या १०० टक्के कर्ज परत करतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही भाषण झाले.
नागपुरात पहिला मॉल
बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात महिला बचत मॉल्स उभारले जातील. याची सुरुवात पुढील महिन्यात नागपूर येथून होणार असून त्यासाठी शहरातील बडकस चौकातील जागा निश्चित करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. बचत गटांच्या वस्तूंची विक्री करण्यासाठी बाराही महिने फिरते प्रदर्शन सुरू करण्याचा शासनाचा विचार असल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.