नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर भाजपसोबत मिळून मत चोरीचा गंभीर आरोप केला होता. त्यावरून देशभरात राजकीय वातावरन तापले आहे. दरम्यान काँग्रेसकडून महाराष्ट्रासह देशभरात निवडणूक गैरव्यवहाराविरूद्ध आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा व्याप वाढत असतांनाच महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय पक्षाने काँग्रेसला आता डिवचले आहे. काँग्रेसला निवडणूक गैरव्यवहाराविरूद्ध लढायचे काय?, ही हे सर्व नाटक आहे, हा प्रश्न उपस्थित करत या पक्षाने नेमके काय म्हटले? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
वंचित बहुजन आघाडीने समाज माध्यमावर पोस्ट करत लिहले की, काँग्रेसला खरोखरच निवडणूक गैरव्यवहाराविरुद्ध लढायचे आहे का? की ते फक्त जनतेला दाखवण्यासाठीचे नाटक आहे?. त्यानंतर वंचितकडून काँग्रेसला बरेच प्रश्न विचारले गेले. त्यात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना निवडणूक घोटाळ्याविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचे आमंत्रण दिले, तेव्हा काँग्रेसचे हे नेते गप्प का राहिले? हा प्रश्नही वंचितकडून उपस्थित केला गेला. या प्रश्नामुळे काँग्रेसच्या निवडणूक गैरव्यवहाराविरूद्धच्या लढ्यावरच वंचितने प्रश्न उपस्थित केले आहे.
वंचितने विचारले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७६ लाख मतांच्या घोटाळ्याविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वंचितकडून पत्र लिहून केले, पण तरीही तू गप्प का राहिलास?. महाराष्ट्र निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर ७६ लाख मतांमध्ये आश्चर्यकारक वाढ झाली, ज्यावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून उत्तर मागितले. तेव्हाही तू गप्प का राहिलास?, या ७६ लाख मतांच्या वाढीविरुद्ध, वंचित बहुजन आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेव्हाही तू गप्प का राहिलास?. दरम्यान वंचित म्हणाली, जर काँग्रेसला खरोखरच निवडणुका निष्पक्ष करायच्या असतील, तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. आता वंचितच्या प्रश्नाला काँग्रेसकडून काय उत्तर दिले जाणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मतचोरीवरून राहुल गांधी यांचे आरोप काय?
भाजप आणि निवडणूक आयोग मिळून ‘मतांची चोरी’ करत आहे आणि ‘बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) द्वारे मतचोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘राहुल गांधी म्हणाले, संपूर्ण भारतात विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका कटकारस्थान करून चोरल्या जात आहेत. त्यांचा शेवटचा कट म्हणजे बिहारमध्ये एसआयआर करून नवे मतदार जोडून आणि जीवंत मतदारांची नावे वगळून बिहारच्या निवडणुकांत चोरी करणे असा आहे. मात्र, आम्ही त्यांना ही निवडणूक चोरी करू देणार नाही, असे आरोप बिहारमध्ये राहुल गांधी यांनी केले आहे.