नागपूर: नागपूरसह परिसरात मागील काही दिवसांपासून एकीकडे अ‌वकाळी पाऊस तर दुसरीकडे उन्हाचा तडाखाही बघायला मिळत आहे. वादळामुळे  बऱ्याचदा वीज पुरवठा खंडित होतो. ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा म्हणून महावितरणकडून वेगवेगळे कामे हाती घेतले गेले आहे.साधारणत: मे महिन्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भात चांगलाच उकाडा असतो. या काळात अधूनमधून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसही पडतांना दिसतो. महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश साहित्य उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकुल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होतो. पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होतो. दरम्यान ऊन्हाळा त्यानंतर लगेच सुरु होणारा पावसाळ्यात ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून महावितरणने वेगवेगळे कामे हाती घेतले आहेत.

महावितरणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी विविध भागातील वीज वाहिन्यांवर आलेल्या वृक्ष व फांद्यांची माहिती गोळा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित विभागांना माहिती दिली आहे. यावेळी संबंधितांना तातडीने वृक्षाच्या फांद्या छाटण्याची विनंतीही केली गेली आहे. वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, कापड, जाहिरात फलक, प्लास्टिक झेंडे काढण्याचे काम हाती घेतले गेले आहे. सैल झालेले गार्डींग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील लोंबकळत असलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. वीज उपकेंद्रातील रोहीत्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे तसेच ब्रिदरमधील सिलीका जेल पिंगट झाले असल्यास ते बदलण्यात येत आहे.

हेही वाचा >>>नागपुरातील महामेट्रोचा “सेव्हन वंडर्स” प्रकल्प वादात…… लाखो रुपये खर्चून उभारलेले “वंडर्स” तोडण्याचा खर्च…..

वीजवितरण यंत्रणेत अर्थिंगचे महत्व अधिक आहे, याकरिता रोहीत्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात सुरू आहे. याशिवाय वीज खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजेचे खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्शुलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची उंची वाढवणे, रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकरची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे अशी विविध कामे सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

हेही वाचा >>>संघाकडून प्रशिक्षण वर्गात बदल…..आता तृतीय संघ शिक्षा वर्ग नव्हे तर…….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी आहे. वीज ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.